राज्यात केवळ 9 टक्के पाणीसाठा

राज्यात केवळ 9 टक्के पाणीसाठा शिल्लक,
बारा हजार गावे-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

राज्याच्या जलाशयातील एकूण उपयुक्त साठा केवळ 9 टक्के इतका शिल्लक असून पाणी टंचाईने भेडसावणाऱ्या 4989 गावे आणि 7939 वाड्यांना 6140 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

धरणात 9 टक्के पाणी साठा
------------------------
राज्याच्या जलाशयातील सर्व प्रकल्पांत आज (16 जून) केवळ 9 टक्के साठा शिल्लक असून गेल्या वर्षी याच सुमारास 16 टक्के पाणी साठा होता. जलाशयातील विभागनिहाय सध्याचा आणि कंसात गतवर्षीचा साठा पुढीलप्रमाणे- मराठवाडा-1 टक्के (5), कोकण-29 टक्के (30), नागपूर-17 टक्के (18), अमरावती-10 टक्के (23), नाशिक-9 टक्के (16) आणि पुणे-7 टक्के (18).

तेरा हजार गावे-वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा
-------------------------------
राज्यातील 4989 गावे आणि 7939 वाड्यांना दि. 13 जून पर्यंत 6140 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील 2956 गावे आणि 1027 वाड्यांचा समावेश असून त्यांना 4003 टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

रोहयोच्या कामावर सात लाख मजूर
----------------------
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात 13 जून पर्यंत 40 हजार 443 कामे सुरू असून या कामांवर 6 लाख 90 हजार 925 मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात 4 लाख 17 हजार 147 कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता 1241.14 लाख एवढी आहे.

राज्यातील चारा छावण्यांमध्ये घट
---------------------------
राज्यातील काही भागांत पाऊस पडल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झाली आहे. तसेच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. त्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांच्या संख्येत घट झाली आहे. बीड जिल्ह्यात 43, उस्मानाबाद 23, अहमदनगर 35, लातूर 5आणि परभणी 1 याप्रमाणे 8 जून अखेर एकूण 108 चारा छावण्या सुरु असून त्यात लहान मोठी अशी एकूण 1 लाख 1 हजार 750 जनावरे आहेत.

राज्यात दुष्काळाची तीव्रता जास्त असताना म्हणजे मे महिन्याच्या मध्यात राज्यासाठी एकूण 435 चारा छावण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील 398 चारा छावण्या सुरु झाल्या होत्या. त्यामध्ये बीड 272, उस्मानाबाद 89, अहमदनगर 31, लातूर 6 अशा छावण्यांचा समावेश. या छावण्यांमध्ये 3 लाख 91 हजार 667 मोठ्या आणि 32 हजार 712 लहान जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय करण्यात आली होती.

खत व बियाण्यांची पुरेसी उपलब्धता
----------------------
राज्यात खरीप हंगामासाठी 43.75 लाख मे.टन खतांची मागणी असून 40.25 लाख मे.टन एवढ्या खतांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय केंद्र शासनाने राज्यासाठी युरिया खताचे एकूण 0.50 लाख मे.टन वाढीव राखीव आवंटन मंजूर केले आहे. खरीप-2015 मधील खत वापराच्या तुलनेत यावेळच्या मागणीचे प्रमाण 26 टक्क्यांनी जास्त आहे. खरीप हंगामातील अपेक्षित क्षेत्र, मागील तीन वर्षाची सरासरी विक्री आणि बियाणे बदल दर यानुसार पिकनिहाय बियाण्याची गरज निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खाजगी क्षेत्राकडे उपलब्ध असणाऱ्या बियाण्याची माहिती घेऊन नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी 14.99 लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून त्या तुलनेत 17.90 लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी