अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान...अनेक गावे अंधारात


नांदेड(अनिल मादसवार)जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने रब्बी ज्वारी, मक्का, गहू, हरभरा, सुर्यफुल, आंब्याच्या पिकाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जवळपास वीस टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आमच्या ठीकठीकानच्या प्रतिनिधींनी वर्तविला आहे. बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे व विजांच्या गडगडटाने शेतकर्यांना नुकसानीत आणले आहे. 

शहर व तालुका परिसरात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून विजांच्या गडगडटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावर्षी खरीप हंगामात अल्प प्रमाणात झालेल्या पर्जन्यामानामुळे शेतकरी नुकसानीत आला होता. त्यानंतर थोड्या प्रमाणात का होईना पाणी असलेल्या शेतकर्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, सुर्यफुल, करडई या मुख्य पिकांची लागवड केली आहे. परंतु शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके व रस्त्यावरील झाडे आडवी झाली असून, कमी क्षेत्र असलेल्या गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. या प्रकारामुळे उत्पादन घटण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविली. काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी धान्याच्या दर्जावर याचा परिणाम होणार आहे. ज्वारी आणि गव्हाचे पीक काळे पडणे, सडणे, कोंब फुटणे व माती चिकटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे धान्याला कमी बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. अवकाळी पावासानंतर पिकांचे पंचनामे करण्यास अनेकदा उशीर होतो. यावेळी कृषी विभागाने तातडीने पावले उचलून नुकसान भरपाईचा निर्णय घेऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी रास्त अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. शनिवारी अवकाळी पावसाची ग्रामीण भागाला अधिक झळ बसली असून, यात फळबागांचे अधिक नुकसान झाले. संत्रा - मोसंबीच्या फांद्या मोडल्याचे सांगण्यात आले तर अनेक ठिकाणी फळपिकांचे बहार गळाले आहेत. आंब्यांचा मोहोरही गळाल्याने फळांची आवक घटण्याची शक्यता आहे. तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले असल्याने खरीप नंतर रब्बी हंगामातील अशाही धुसर होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच वादळी वार्यामुळे महावितरण कंपनीच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. 

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाबरोबर जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारीसह काही गावात गारांचा पाऊस झाल्याने तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर तालुक्यातील काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नांदेड- किनवट मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच हदगाव तालुक्यातही पावसाने वादळी वार्यासह पुन तास हजेरी लाऊन गव्हाचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. 

तसेच मुदखेड, डोणगाव, मेंड्का व भोकर परिसरात वादळी वार्यासह पावसाचे आगमन व गारपीट झाल्यामुळे केळी, हरभरा, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कंधार, लोहा, नरसी, उमरी, तर नांदेड शहरात सुरु असलेल्या रिमझिम पावसाचा परिणाम जाणवला आहे. नांदेडमध्ये सुरु असलेल्या शंकर दरबार कार्यक्रमावरही वादळी पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. तसेच नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील पुसद, उमरखेड यासह परिसरात अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. गेल्या तीन वर्षापासून सतत अवकाळी पावसाच्या तडाख्याने रब्बी हंगामातील हातची पिके गमवावी लागत आहे. एकूणच या अवकाळी पावसामुळे सर्वत्र थंडगार वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी