आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीग्रहात सुविधांचा अभाव.. 
हिमायतनगर(प्रतिनिधी)आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या मुलांच्या शासकीय वसतिगृहात गेल्या अनेक महिन्यापासून विविध गैरसोयीने डोके वर काढले आहे. परिणामी निवासी विद्यार्थ्यांची हेळसांड होत असून, यास संबंधित कंत्राटदार व गृहपाल जबादार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटच्या नियंत्रणाखाली हिमायतनगर शहरात आदिवासी मुलाचे वस्तीग्रह हे भाड्याच्या इमारतीत चालविले जात आहे. हिमायतनगर - बोरगडी रस्त्यावर असलेल्या वस्तीग्रहात सुमारे शंभर १२२ मुलांच्या भोजन, निवासाची व्यवस्था आहे. येथील अधीक्षक पदाचा कारभार एस.डी. दोमकोंडकर तर भोजन व्यवस्था हि कंत्राट दारामार्फत केली जाते. वसतिगृहात अन्य कर्मचारी देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेली आहेत. मात्र वस्तीग्रह अधीक्षक हे नेहमी बाहेरगावी राहून इतर कर्मचाऱ्यावर कामे सोपवून अधून - मधून चकरा मारतात. आणि विद्यार्थ्यांना गोड आश्वासने देवून झुलवत ठेवतात. आतापर्यंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ड्रेसकोड, निर्वाह भत्ता, संगणक व्यवस्था, विद्यार्थी भत्ता, क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात कुचराई करून मनमानी कारभार चालविला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध नसल्याने पेपर वाचायला मिळत नाहीत. शैक्षणिक सहल निघालीच नाही, अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही. १२२ मुलासाठी केवळ १० कैन शुद्धपाणी दिले जात असून, त्यातही दुर्गंधी येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या मेनुप्रमने भोजन आणि फराळाची व्यवस्था केली जात नाही. तसेच गेल्या काही महिन्यापासून ग्रहपाल नेहमी बाहेरच राहत असल्याने जेवणासाठी ठेकेदाराने नियुक्त केलेले कर्मचारी सुरळीत व चवदार जेवण देत नाहीत. तसेच वस्तीग्रह परिसर घाणीने व्यापला असून, झोपण्यासाठी तुटलेले पलंग, बंद पंखे आणि दार तुटलेल्या बाथरूममुळे विद्यार्थ्यांवर नामुष्की ओढवली जात आहे. याबाबत ग्राहपालाकडे अनेकदा तक्रारी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी सर्व मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना साथीच्या रोगाची लागण होत असल्याने काही विद्यार्थी गैरहजर राहत आहेत. असे असताना देखील त्यांच्या नावाची रक्कम ग्रहपाल व संबंधित कंत्राटदार संगनमताने दर महिना उचलून शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला जात असल्याने अधीक्षकाच्या कारभाराचे पितळे उघडे पडत आहे.
शासन परिपत्रकानुसार अधीक्षक व जेवण बनविणाऱ्या ठेकेदाराने दर माह प्रतीविद्यार्थी २ हजार ७४० रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. दररोज नियमित जेवणात गहू, तांदूळ, भाजीपाला, इत्यादी वस्तूचा वापर करणे बंधनकारक असून, पोळी भाजी, कंदफळ, पालेभाज्या, वरण, भात, कांदा, दही, लोणचे देणे गरजेचे आहे. सकाळी जेवणात नास्त्यासाठी साबुदाणा, उपमा, शिरा, पोहे यापैकी एक १०० ग्रेम, दुध २०० मिली. १५ ग्रेम साखरेसह, दररोज उकडलेली अंडी व शाखाहारी मुलांसाठी ५० ग्रेम वजनाचा बिस्किटचा पुडा प्रत्येक दिवशी ऋतूनुसार फळे वाटप करण्याचे शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच दर आठवड्याला आलटून- पालटून मटण, चिकन प्रती विद्यार्थी २०० ग्रेम रविवारी सोबत कांदा, लिंबू, तसेच शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी एक वेळ १५० ग्रेम स्वीट (गोड पदार्थ), बासुंदी जिलेबी, बालुशाही, श्रीखंड, गुल जमून, यापैकी एक, नियमित जेवणात द्यावे. आणि आलटून - पालटून सलाड देणे बंधनकारक आहे. असा शासनाचा नियम असताना मात्र येथील मुलांच्या वस्तीग्रहात मात्र यापैकी एकही आट मान्य केल्या जात नाही. आलू किंवा गोबी अश्यापैकी एकाच पदार्थाची भाजी ती सुद्धा केवळ हळद चटणी मीताच मारा देवून विद्यार्थ्यांना खाऊ घातले जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावे आलेले वार्डन व भोजन व्यवस्थापक वाटून खाऊन गलेलट्ठ होत असल्याचे त्यांच्या कारभारावरून दिसून येत आहेत. येथील वार्डन ( अधीक्षक - दमकोंडेकर ) हे गेल्या ५ वर्षापासून ठाण मांडून बसलेले असून, ते सुधा नांदेड सारख्या शहरात राहून येथे अमावस्या - पौर्णिमेला चंद्राप्रमाणे येवून आपली पगार घट्ट करीत आहेत. अश्या बेजबाबदार कर्मचार्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. आणि ज्यांच्या नावे भोजन बनविण्याचा परवाना आहे. त्यांचा परवाना तत्काळ रद्द करून शासन परिपत्रकानुसार सकस आहार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील निवासी विद्यार्थ्यां करीत आहेत.
तुम्हाला काय छापायचे ते छापा - ग्रहपाल
--------------------------
कालच जेवण व्यवस्थित दिले जात नाही अशी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज ग्रहपालाने दाबण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी चक्क कार्यालयास कुलूप ठोकले होते. आश्वासन दिल्यानंतर काढण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पत्रकारांनी वस्तीग्रहास भेट देवून विचारणा केली असता जेवण मिळाले नाही हे ठेकेदाराचे काम आहे. असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला, तसेच उर्मटपनाचे वक्तव्य करीत तुम्हाला काय छापायचे ते छापा अशी भाषा वापरत बाहेर निघून गेले. यावेळी विद्यार्थी व अधीक्षक यांच्यात वादावादी सुरु असल्याने विद्यार्थी जमले होते. वस्तीग्राहतील अधिका माहितीसाठी येथे एकही जबाबदार अधिकारी नसल्याने अन्य माहिती मिळू शकली नाही.
अधीक्षक व कंत्राटदारास नोटीस बजावूनही जेवण निकृष्ठ
---------------------------------------
गेल्या डिसेंबर महिन्यापासूनत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणात आल्या निघाल्याने खळबळ उडाली होती. त्यावेळी शिक्षणासाठी नरक यातना भोगाव्या लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पत्रकारासमक्ष दिल्याने अधीक्षक व भोजन व्यवस्थापकाच्या दुर्लक्षित कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. याबाबतचे वृत्त नांदेड न्युज लाईव्हने प्रकाशित केल्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटचे प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी संबंधित कंत्राटदारास व अधीक्षक दोमकोंडेकर यांना नोटीस बजावली होती. परंतु अजूनही येथील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसून निकृष्ट व बेचव जेवण दिले जात असल्याने रविवारी रात्रीला येथील विद्यार्थ्यांना बाहेर जेवण करण्याची वेळ आली होती.