आंबेडकरांचे निवासस्थान खरेदी प्रक्रिया सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील निवासस्थान खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांना घर खरेदीसाठी राज्य शासनाने दिले इरादापत्र


मुंबई(प्रतिनिधी)भारतरत्नडॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील वास्तव्य ज्या घरात होते,ते घरखरेदी करण्यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढील पाऊल उचलले आहे. हे घर खरेदीकरण्यासाठी श्री.तावडे यांनी लंडन मधील भारताच्या उच्चायुक्तांना लेटर ऑफ इंटेंट” अर्थात इरादापत्र पाठवले आहे. भारताच्या लंडन मधील उच्चायुक्तांमार्फत राज्यसरकार घर खरेदीची प्रक्रिया करणार आहे.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांना पाठवलेल्या इरादापत्रात श्री. तावडे यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडन येथील हे घर सांस्कृतिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. लाखो भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद असलेली ही वास्तु खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यादृष्टीने हे घर खरेदी करण्यासाठी मी हे इरादापत्र आपल्याला पाठवत आहे. आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार आपण योग्य किंमतीत हे घर खरेदी करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असेलच. आम्हाला विश्वास आहे की लंडन येथील प्रशासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही श्री. तावडे यांनी या पत्रात म्हटले आहे.

जागतिक शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेसाठी विनोद तावडे नुकतेच लंडन येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात बुद्धिस्ट फोरमच्या संतोष दास यांच्याशी संपर्क साधला व हे घर खरेदी करण्यासंदर्भातील व्यवहाराची माहिती घेतली होती. हे घर विकण्यासाठी जाहिरात देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. तावडे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे घर विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तावडे यांनी तातडीने बुद्धिस्ट फोरम आणि भारतीय उच्चायुक्तचे अधिकारी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या निवासस्थानाला भेटही दिली आणि इंडिया हाउसमध्ये ब्रिटिश उच्चायुक्त रंजन मथाई, संतोष दास व तेथील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करून, कायदेशीर बाबी तपासून आणि परराष्ट्र खरेदीचे नियम पूर्ण करून पुढील 2 महिन्यांत यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार श्री. तावडे यांनी घर खरेदीची पुढील प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री. तावडे यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांना दिलेल्या इरादा पत्रात घर खरेदीची पुढील प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी