पं. नेहरू यांच्या विचारकार्यावरील व्याख्यानास प्रतिसाद
पुणे। ‘संविधानिक राष्ट्रवाद मंचा’च्या वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान आणि विश्वनेते पं.जवाहरलाल नेहरू यांच्या १३३ व्या जन्मदिनानिमित्त सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आयोजित ' सोहळा पंडित नेहरूंच्या विचाराचा ' या प्रा. श्रीरंजन आवटे यांच्या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
हे व्याख्यान एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ, पुणे येथे झाले. ' सोहळा पंडित नेहरूंच्या विचारांचा ' मधील हे दुसरे व्याख्यान होते.पहिले व्याख्यान रविवारी झाले. या व्याख्यानामधून पंडितजींचे विचारविश्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या काही महत्त्वाच्या परिमाणांचा वेध घेण्याचा प्रयत्न श्रीरंजन आवटे केला.सोमवारी झालेल्या दुसऱ्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. प्रा. श्रद्धा कुंभोजकर या होत्या.
व्यासपीठावर प्रसाद झावरे, प्रशांत कोठडिया , अंजली चिपलकट्टी उपस्थित होते. कलीम अझीम , श्रुती तांबे यांनी स्वागत केले. विठ्ठल मणियार, डॉ. प्रदीप आवटे, जांबुवंत मनोहर, रवींद्र धनक यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते.
श्रीरंजन आवटे म्हणाले, 'नेहरूंचे विचार त्यांच्या काळापेक्षा ते आज अधिक औचित्यपूर्ण आहेत. नेहरूंबद्दल भारतभर जिव्हाळा, आदर होता. राष्ट्राच्या सुकाणूस्थानी बसलेले नेहरू हे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. 'फाळणीची जखम घेऊन भारताची सुरवात झाली. भाषणांपेक्षा कृतीशी नेहरूंचे नाते असल्याने भारताची प्रगती झाली. नेहरूंच्या विचारात संसदीय लोकशाही, सर्वसमावेशक राष्ट्रवाद, वैश्विक विचार, समाजवादी प्रारुप, वैज्ञानिक दृष्टीकोण हे पैलू महत्वाचे आहेत.
देशात स्वायत्त संस्थात्मक रचना त्यांच्या डोळयासमोर होत्या. अल्पसंख्याकांच्या हक्काचे रक्षण त्यांच्या लोकशाही विचारात अंतर्भूत होते. प्रधानसेवक या शब्दाने नेहरूंनी स्वतःला संबोधले होते. भारतीय संघराज्यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच आव्हान आहे, हे नेहरूंना कळले होते. बहुसंख्यांकांचा जमातवाद हा राष्ट्रवाद म्हणून प्रकट होऊ शकतो, हा धोका त्यांनी ओळखला होता.
स्वयंप्रज्ञ अलिप्ततावाद नेहरूंनी स्वीकारून जगाला नवी वाट दाखवली. कोरिया युध्दात भारताने समेट घडवून आणला. काश्मीर हा मूलतः आंतरराष्ट्रीय स्वरुपाचा प्रश्न बनत असल्याने नेहरूंनी त्यात उडी घेतली. काश्मीर भारतात येण्यात नेहरूंची भूमिका निर्णायक होती. नेहरूंच्या आंतरराष्ट्रीय भानामुळे भारताला गरूडभरारी घेण्यास अवकाश मिळाला. विद्यमान पंतप्रधानांनी नेहरूंना वारंवार जबाबदार ठरवल्याने नेहरू अधिक अभ्यासले जात असले तरी नेहरूंची परंपरा जपण्यात आपण कमी पडलो आहोत.