नाट्यमय अभिवाचनातून घडले परखड कुरुंदकरांचे दर्शन -NNL

' नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट ' ला उदंड प्रतिसाद


पुणे।
तर्काधिष्ठित आणि परखड विचारांबरोबरच चिंतनशील झालेले अवघे जीवन आणि गहन अभ्यासातून तयार झालेल्या विचारांशी तत्वनिष्ठ राहून जगतानाच्या वेधक, भेदक आणि अंतर्मुख करायला लावणाऱ्या प्रसंगांनी तसेच साभिनय अभिवाचनाच्या नाट्यप्रयोगाने ख्यातनाम विचारवंत (कै.) नरहर कुरुंदर यांची पुणेकर रसिक श्रोत्यांना भेट घडवली. ज्ञानवंताचे अलौकिक जगणे समोर आणणाऱ्या प्रसंगांनी रोमांच उभे करीत रसिकांना समृद्धही केले.

नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान आयोजित ' नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट ' हा नाटय प्रयोग यशवंतराव चव्हाण नाटयगृह, कोथरूड, पुणे येथे शनीवार,१२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, ' हम लोग, पुणे ' यांच्या सहकार्याने झाला. हा प्रयोग निःशुल्क होता. या नाट्यप्रयोगाची संकल्पना व लेखन अजय अंबेकर यांचे होते. या नाटयप्रयोगात दिलीप पाध्ये, ज्योती पाध्ये, राजीव किवळेकर, शुभंकर देशपांडे, अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर यांचा  सहभाग  होता. मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथील यशस्वी प्रयोगानंतर हा प्रयोग प्रथमच पुण्यात झाला.

पुण्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, भरगच्च रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या आगळ्या- वेगळ्या नाट्य प्रयोगातून कुरुंदकर यांच्या जगण्यातील अनेक  प्रसंग मोठ्या खुबीने मांडण्यात आलेच; शिवाय वक्ते म्हणून कुरुंदकरांची महाराष्ट्राला होत गेलेली ओळख, त्यांची विचार करण्याची तसेच विचार मांडण्याची व इतरांना पटवून देण्याची पद्धतही नाट्यप्रयोगातून अतिशय प्रभावीपणे उलगडत गेली.


कुरुंदकरांच्या धर्मचिकित्सेची  विविध उदाहरणेही नाट्यप्रयोगातून समोर आली आणि त्यांचा परिणाम जवळजवळ सगळ्याच प्रसंगांमधून अधोरेखित झाला. सर्वच कलावंतांच्या उत्तम अभिनयाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचलनातून कुरुंदकर गुरुजींवर होत गेलेले भाष्यही मार्मिक ठरले .

अनोखे रंगमंचीय सादरीकरण सुप्रसिद्ध विचारवंत  नरहर कुरुंदकर यांचा जीवन प्रवास व विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे प्रभावीपणे मांडणारे “नरहर कुरुंदकर – एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे एक अनोखे रंगमंचीय सादरीकरण होते. हा कार्यक्रम म्हणजे नाटकाच्या संहितेच्या अभिवाचनाचा एक प्रकारचा अभिनव नाट्यप्रयोग होता. नांदेड येथील प्रथितयश कलाकर हा प्रयोग सादर करतात. बांधेसूद संहिता, कल्पक रेखाचित्रे, प्रसंगांना उठाव देणारे परिणामकारक संगीत तसेच प्रकाश नियोजन आणि कलाकारांचे ‘अभ्यासोनी प्रगटावे‘ असे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. 

सात पुरुष, दोन महिला आणि एक बाल कलाकार हा प्रयोग सादर करतात. यात प्रसंगानुरूप वेशभूषा, रंगभूषा यासह साभिनय सादरीकरण हे कलाकार करतात. दोन अंकी प्रयोग आणि मध्यंतराचा कालावधी वगळता दोन तास असा या प्रयोगाचा अवधी होता.  नरहर कुरुंदकर यांच्या आयुष्यातील अनेक घडामोडी त्यांचे विचार आजच्या परिस्थितीतही किती उपयुक्त आहेत हे या प्रयोगाने मांडले . 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी