पंतप्रधान स्वनिधी योनजेतून लघु उद्योजकांचा आर्थिक विकास करणार - केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड -NNL

लघु व्यावसायिकांना स्वनिधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन.


औरंगाबाद|
लघु उद्योजकांना  रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेतून वित्त पुरवठा केला जात आहे. फेरीवाले, फळविक्रेते, धोबी, चर्मकार यांच्यासह इतर व्यवसायिकांना स्वनिधीतून 10 हजारापर्यंतचा अल्प दरात कर्जपुरवठा केल्याने स्थानिक पातळीवर व्यावसायिकांचा आर्थिक विकास साध्य केला जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.

महानगर पालिका औरंगाबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त् विद्यमाने आयोजित आर्थिक समावेशन व वित्त सहाय्य अभियान मेळाव्याचे उद्घाटन श्री.कराड यांच्या हस्ते   संत एकनाथ रंगमंदिर येथे झाले. या अभियानात लाभार्थ्यांना स्वनिधी कर्ज योजनेचे धनादेश वाटप डॉ.कराड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा, विभाग प्रबंधक रोहित कशाळकर, उपविभागीय अधिकारी मंगेश केदार यांच्यासह इंडियन बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक आदी बँकांचे व्ययस्थापक, प्रतिनिधी याचबरोबर लाभार्थी उपस्थित होते.


स्थानिक लोकांना रोजगार आणि व्यवसायासाठी पंतप्रधान स्वनिधी योनजेतून मदत केली जात असून यासाठी महानगर पालिकेमध्ये विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी कर्ज घेण्यासाठी अर्जदाराने कागदपत्रांसह नोंदणी करण्याचे आवाहन डॉ.कराड यांनी केले. यामध्ये सलून, पार्लर, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले, चहा टपरीवाले, अंडी आणि पाव विक्रेते, यासारख्या व्यावसायिकांना दहा हजारांपासून आर्थिक मदत कर्जस्वरुपात दिली जाणार आहे. यासाठी सर्व बँकांनी व जिल्हा प्रशासनाने कर्ज मिळवून देण्यामध्ये सहकार्य करावे असे निर्देश डॉ.कराड यांनी संबंधितांना दिले.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना व्यवसायाबरोबर माणसं उभी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेली असून आर्थिक् विकासासाठी कर्जाची साथ बँकेच्या माध्यमातून देत आहे. व्यवसायिकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच अटल पेंशन योजना, मुद्रा योजना, जीवन ज्योती योजना, यासारख्या सामाजिक सुरक्षितता प्रदान करणाऱ्या योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लाभार्थ्यांना केले.

शहरामध्ये महानगर पालिकेच्या माध्यमातून फेरीवाले व लहान व्यावसायिकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी त्यांच्या अर्जांच्या नोंदणीची सोय महानगर पालिकेच्या कक्षात केली असून यासाठी अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी केले. आर्थिक समावेशन व वित्त सहाय्य समाजयोजनेच्या माध्यमातून नविन लाभार्थ्यांची नोंदणी याठिकाणी केली जाणार आहे. स्वनिधी योजनेच्या जिल्ह्याचा लक्षांक पूर्ण करण्याची ग्वाही श्री.चौधरी यांनी यावेळी दिली.

लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात 10 हजार रु रकमेचा धनादेशांचे वाटप करण्यात आले. यामध्ये बुध्दम बोराडे, रईस अली, दिव्या हुबळीकर, दीपा बनकर, बाळासाहेब हिवराळे, किरण खांडेकर, जीवन कडुकर, ज्योती खरात, रेश्मा शेख, साजेद गुलाम साजेद शेख यांचा समावेश होता. याबरोबरच मुद्रा योजनेअंतर्गत गणेश सूर्यवंशी व कृष्णा सूर्यवंशी, यांना दुग्धव्यवसायासाठी 7 लाख 80 हजारांचा धनादेशही देण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी