थेट राज्याच्या मुख्यमंत्री स्तरावरुन दखल ; जिल्हा परिषदेसह पंचायत समितीकडून मात्र चौकशीच नसल्याने किरण वाघमारे यांचे सोमवारपासून उपोषण
नायगांव बा./नांदेड| तालुक्यातील औराळा येथील सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे यांनी आपल्या कार्यकाळात स्वकुटूंबात दोन घरकुलासाठी निधी उचल प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात असतांनाच स्थानिक कंत्राटी ग्रामसेवकाच्या संगनमतातून आपल्या पतीच्या नावे यापूर्वीच शौचालय बांधकामाचे अनुदान उचलल्यावर पुनश्च दुबार अनुदान लाटल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतरच्या तक्रारीची दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने घेऊन राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सचिवांनाच या प्रकरणात योग्य त्या कार्यवाहीचे आदेश दिले मात्र जिल्हा परिषदेसह पंचायत समितीस्तरावरुन अद्यापही चौकशीसह दोषींवर ठोस कारवाईच नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किरण वाघमारे व माजी उपसरपंच प्रल्हाद पवार यांनी उद्या दि.२६ सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निर्धार व्यक्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत कार्यालय औराळा येथील सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे यांनी आपल्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करुन त्यांच्या पतीच्या नांवे असलेल्या मालमत्ता क्रमांक २४० या मालमत्तेत ग्रामपंचायतीच्या मालमत्ता, नमुना नंबर ८ नोंदवहीत गवती छप्पर व रिकामी जागा अशी नोंद असतांना व त्या ठिकाणी त्यांनी अनाधिकृतपणे पक्के घर बांधकाम केलेले असतांनाही आपल्या स्वतःच्या एकत्रित कुटुंबाला कागदोपत्री विभक्त असल्याचे दाखवून पती सतिश नारायण वाघमारे व सासू अनिता नारायण वाघमारे या दोघांची नांवे शासनाच्या रमाई आवास योजनेतून मंजूर करुन घेतली व प्रत्यक्षात एकाच घरकुलांचे बांधकाम सुरु करुन स्थानिकचे तत्कालीन ग्रामसेवक ए.एम. हाळदेवाड, कार्यरत कंत्राटी ग्रामसेवक आर.जी. मुदखेडे व बांधकाम विभागाच्या संबधित अभियंत्याला हाताशी धरुन यासाठीचा निधीही उचल केला.
याबाबत माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती प्राप्त करुन घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व माहिती अधिकार कार्यकर्ते किरण वाघमारे यांनी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीकडे रितसर पुराव्यानिशी तक्रार करुन सदर प्रकरणातील दोषींसह त्यांना पाठीशी घालणारेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात योग्य त्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारीस्तरावरुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनेक पत्रानंतर चक्क स्मरणपञ तर,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी देगलूरचे तत्कालीन सहा.गटविकास अधिकारी सी.एल.रामोड यांना गतवर्षी दि.१६ सप्टेंबर रोजी तर,त्यांच्याच अध्यक्षतेखाली तब्बल दोनवेळा येथील विविध कामांच्या चौकशीसाठी चौकशी समिती गठीत केली होती.
दोन्ही समितीपैकी दि.२४ नोव्हेंबर २०२१ च्या समितीत याच प्रकरणात आरोप असलेला नायगांवचा शाखा अभियंता व दि.२ डिसेंबर २१ च्या गठीत समितीत नायगांव पंचायत समितीत कार्यरत असतांना औराळ्यामध्येच बनावट कागदपत्रांतून 'एका' कुटूंबियास दुहेरी घरकुलाच लाभ दिल्याचा पोलीस दप्तरी गुन्हा नोंद असलेला बिलोली पंचायत समितीमधील 'त्या' आरोपी शाखा अभियंत्यालाही नियुक्त करुन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले होते.तब्बल सात ग्रामसेवकांना त्यांचा कार्यकाळातील चौकशी असल्याने त्यांना चौकशीवेळी हजर राहण्याचे आदेश 'राजेशाही' थाटात काढून या समितीच्या अध्यक्षांनी चौकशी दरम्यान पत्रासह पुरावे घेतले मात्र पोहच दिली नाही.
दि.१८ डिसेंबर २१ रोजी केलेल्या चौकशीचा अहवाल आजपर्यंत वरिष्ठांना सादरच केला नाही.या चौकशीच्या माध्यमातून त्यांनी 'चांगलेच' आर्थिक हित साधले सोबतच, पदोन्नतीवर अन्यस्त्र बदलूनही गेले त्यामुळे चौकशीनंतरही दोषींविरुद्ध कारवाई प्रलंबितच राहिली.त्यातच येथील कंत्राटी ग्रामसेवक मुदखेडे यांनी सरपंचांच्या पतीराजांना त्यांनी यापूर्वी घरकुल बांधकामासह शौचालय बांधकाम अनुदान उचल केल्यानंतरही दुसर्यांदा रु.१२ हजाराचे अनुदान दिल्याचे व शासकीय योजनेतून हा या कुटुंबातील चौथा लाभ असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्यासह संबंधित विभागाकडे पुनश्च पुराव्यानिशी किरण वाघमारे व प्रल्हाद पवार यांनी रितसर तक्रार नोंदविल्यानंतर थेट मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने या तक्रारीची दखल घेऊन राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव राजेश कुमार यांना याबाबत योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले तर,नित्याप्रमाणेच कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करीत दि.२१ सप्टेंबर रोजी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी व दि.२३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही नायगांव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडून स्वतः दूरच परंतू,वरिष्ठांच्या आदेशानंतरही या प्रकरणात अद्यापही चौकशी केली नाही.
विशेष बाब म्हणजे सरपंच सौ.वर्षा वाघमारे व कंत्राटी ग्रामसेवक मुदखेडे यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामांच्या निधीत संगणमतातून पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डि.व्ही.गोणेवार यांना हाताशी धरुन गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणाची चौकशी अद्यापही गुलदस्त्यातच आहे परंतू,तरिही संबधित कंत्राटी ग्रामसेवकाने चक्क सरपंचांनाच अनेक योजनांचा लाभ दिला असल्याने त्यांनी असाच लाभ अनेकांना बनावट कागदपत्रांवर दिल्याचेही उघड झालेले आहे. त्यामुळेच त्यांची सेवासमाप्ती करावी सोबतच,सरपंच व संबधितांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी किरण वाघमारे व पवार हे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२६ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर सरपंच अपात्र ठरणार ?
महत्वाचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत अर्ज सादर करतांनाच संबधित उमेदवाराकडे स्वतःचे शौचालय बांधकामासह त्याचा वापर असल्याचे प्रमाणपत्र स्थानिक ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीत सादर करणे अत्यावश्यक आहे. त्यानुसार सरपंच सौ.वाघमारे यांनी तसे दिलेले आहे. परंतू,तरिही पतीच्या नांवे याबाबतचे दुबार अनुदान उचलले आहे.ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या कार्यकाळात स्वतः वा स्वकुटूंबात शासनाच्या कोणत्याच वैयक्तिक योजनांचा लाभ घेता येत नाही मात्र तरिही पदाचा गैरवापर करुन सासू व पतीच्या नांवे घरकुल (विशेष बाब म्हणजे घरकुल बांधकामाच्या अंदाजपत्रकात शासन नियमानुसार शौचालय बांधकाम समाविष्ट असतांना !) व पुनश्च पतीच्या नांवे शौचालय बांधकाम अनुदानाचा असा तब्बल चारवेळा लाभ घेतला असल्याचा प्रकार पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने नायगांवच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून स्थानिक पंचायत विभागाच्या बहूचर्चित अन् प्रत्येक प्रकरणात आर्थिक हित साधण्यात 'माहिर' असलेल्या 'एका' विस्तार अधिकाऱ्यांच्या अट्टहासामूळे सद्यातरी या चौकशीला मुहूर्तच सापडलेला नाही.परंतू, चौकशीअंती कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यापाठोपाठ सौ.वर्षा वाघमारे ह्या आगामी काळात ग्रामपंचायत सदस्य व पर्यायाने सरपंचपदावर काम करण्यासाठी अनर्ह/अपात्र ठरतात अशी खात्रीलायक माहिती ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठांकडून प्राप्त झाली आहे.