भाभा परमाणू अनुसंधान केंद्रातील संशोधकांशी संवाद
नांदेड। विकिकिरण तंत्रज्ञानाद्वारे कृषी उत्पादनाचे आयुष्य वाढवून निर्यात वृद्धी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विकिकिरण तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घेता येईल याबाबत भाभा परमाणु अनुसंधान केंद्रातील संशोधकांशी खासदार हेमंत पाटील यांनी आज दि. ७ सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा केली.
यावेळी विषम तापमानात जास्त उत्पादन देणाऱ्या प्रजाती , यांत्रिकीकरण , उत्पादन वाढीसाठी केले जाणारे विविध प्रयोग यावर सखोल चर्चा झाली . याप्रसंगी खासदार हेमंत पाटील यांच्यासह भाभा परमाणु अनुसंधान केंद्र संचालक डॉ. ए. के. मोहंती , बायोसायन्स विभाग संचालक डॉ. तपनकुमार घंटी, न्यूक्लिअर ऍग्रीकल्चर बायोटेक विभाग संचालक डॉ. टी. आर. गणपती, अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. गौतम , शास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉ. सुधीर सिंग , न्यूक्लिअर ऍग्रीकल्चर बायोटेक विभाग अधिकारी डॉ. एस. टी.मेहेत्रे ,अन्न तंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. भास्कर संन्याल, न्यूक्लिअर ऍग्रीकल्चर बायोटेक विभाग अधिकारी डॉ. मंजया, डॉ. सुधांशू सक्सेना , सनदी लेखापाल मयूर मंत्री, यांची उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या चर्चेबद्दल बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, मराठवाड्यातील विषम तापमानात जास्त उत्पादन देणाऱ्या प्रजातीवर जनुकीय बदल करण्याच्या संदर्भाने भाभा परमाणु अनुसंधान केंद्रातील संशोधकांनी पुढाकार घेतला असून येत्या वर्षभरात अश्या प्रकारचे बदल केलेले हळदीचे बेणे तयार करण्यासाठी भाभा परमाणु अनुसंधान केंद्रा सहकार्य करणार आहे .
तसेच आजवर शेतीमधील ५५ प्रकारच्या विविध पिकांच्या जातीवर मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणून विकिकिरण ( हाय रेडिएशन ) प्रक्रिया वापरल्यामुळे नाशवंत मालाचे आयुष्य वाढले आहे . त्यामुळे कीटक व परजीवी घटकांपासून पक्या मालाचे वर्षानुवर्षे संरक्षण करणे शक्य झाले आहे.त्यामुळे अश्या प्रकारची एक प्रयोगशाळा हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे स्थापन करावी यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले .
देशात महाराष्ट्र,आंध्र प्रदेश,तेलंगणा,तामिळनाडू, छत्तीसगढ या राज्यात हळद उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये महाराष्ट्र हे हळद पिकाखालील क्षेत्रानुसार येणारे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे तर राज्यात हिंगोली जिल्हा हळद उत्पादनात आघाडीवर आहे. राज्यातील हळदीचे उत्पादन आणखी वाढविण्याच्या दृष्टीने हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीची स्थापना खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली होती.
हळदीचे नवीन संकरित बियाणे, हळदीसाठी विम्याची तरतूद, खत आणि पाण्याचे योग्य नियोजन , औजारे, कुरकुमीन तपासणी केंद्र, हळद निर्यात धोरण, उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर करून हळदीचे उत्पादन घेणे , हळदीसाठी लागणारे कृषी यांत्रिकीकरण , पोकरा अंतर्गत हळद लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन व मुल्य साखळी बळकटीकरण, बॉयलर व पोलिशर साहित्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी, निर्यात धोरणात सुसूत्रता आणणे, कुरकुमीन तपासणी केंद्र याबाबतचा धोरण मसुदा तयार करून राज्यशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
सोबतच अणुऊर्जेचा उपयोग सुद्धा दुप्पट उत्पादनासाठी करून घेता येईल का या उद्देशाने आजची बैठक मुंबई येथे भाभा परमाणु अनुसंधान केंद्रात आयोजित करण्यात आली होती . बैठकीत हळदीचे संकरित बेणे, त्यावरील प्रक्रिया यासह विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी भाभा परमाणु अनुसंधान केंद्र संचालक डॉ. ए. के. मोहंती , यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अणुऊर्जेचा कृषी उत्पादन आणि प्रामुख्याने हळद उत्पादनात ज्या पद्धतीने वापर करून घेता येईल त्याकरिता आम्ही तत्पर असल्याचे सांगितले .