योजनांची माहिती व लसीकरणाची गती देण्यासाठी "कोरोना लसीकरण जनजागृती" चलचित्र भिंतरथ प्रारंभ -NNL

किनवट, गौतम कांबळे| किनवट येथील विविध शासकीय विकास योजनांची माहिती देण्यासाठी व लसीकरणाची गती वाढविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट व नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या "कोरोना लसीकरण जनजागृती" चलचित्र भिंतरथ  मोहीमेचा प्रारंभ येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. 

आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पूजार, तहसिलदार उत्तम कागणे, नियोजन अधिकारी शंकर साबरे,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांचे हस्ते एलईडी वॉल व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून "कोरोना लसीकरण जनजागृती"ला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नागरी दवाखान्याचे डॉ. संतोष गुंटापेल्लीवार,पत्रकार गोकुळ भवरे, गोवर्धन मुंडे, अनिरुद्ध केंद्रे, रमेश मुनेश्वर, जयपाल वाघमारे उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधासाठी "कोविड लस" हा उत्तम उपाय आहे. परंतु अफवा व अज्ञानापोटी किनवट-माहूर तालुक्यातील आदिवासी बहुल कोलाम आदिमासह इतर समाजही लस घेण्यासाठी पुढं येत नव्हता, तेव्हा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रेरणेने सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण पूजार यांनी अनोखी संकल्पना आखली. त्यातूनच "कोरोना लसीकरण जनजागृती मोहीम" साकारली. तहसिलदार उत्तम कागणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शना खाली जनजागृती प्रमुख गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या नेतृत्वात जनजागृती सहायक व मिडिया समन्वयक उत्तम कानिंदे यांनी स्वतः दिग्दर्शीत गोंडी, कोलामी, बंजारी, तेलगू, मराठी चित्रगीतांची निर्मिती केली आहे.  


रुपेश मुनेश्वर, सुरेश पाटील, भूमय्या इंदूरवार,रमेश मुनेश्वर व महेद्र नरवाडे यांनी लिहिलेली, प्रदीप कुडमेते, भूजंग मेश्राम, शाहीर दौलत राठोड, रामराव राठोड यांनी अनुवादित केलेली गीते आम्रपाली वाठोरे, प्रकाश सोनवणे, सुरेश पाटील, रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर यांनी गायिली आहेत. प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे यांनी तबला सुरज पाटील, व्यंकट मुंडावरे, हँडसोनिक राहूल उमरे, ढोलकी साहेबराव वाढवे यांच्या साथीने सुरेख संगीत दिले. राष्ट्रदीप कयापाक यांनी ध्वनीक्षेपण यंत्रणा उपलब्ध करून दिली. सर्व गीतांचे ध्वनीमुद्रण, चित्रीकरण, मिश्रण, संपादन नुकाताच इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी निवेदक कानिंदे यांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शक गुरू पवार यांच्या मार्गदर्शना खाली रोहित भरणे, प्रज्योत कांबळे, दीपक शिंगणे, गुरुकांत वाठोरे, किशोर वाठोरे, प्रणोश गोणेवार, टीना राठोड, प्रेरणा तामगाडगे यांनी नृत्य सादर केले. रेखा सोनवणे व प्रकाश सोनवणे यांच्यावरही एक गीत चित्रीत आहे. मैनाबाई पाटील, वंदना पाटील - तामगाडगे व गायत्री चव्हाण यांचं वेशभूषा सहाय्य मिळालं.

येथील शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ कराड व सर्व स्टाफ आणि रतनीबाई राठोड प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश जाधव व सर्व स्टाफ यांनी ध्वनीमुद्रणासाठी व प्राथमिक आरोग्य केंद्र राजगड यांनी चित्रीकरणास सहकार्य केले आहे. आदिवासी भागातून जनजागृती साठी केलेल्या या अप्रतिम प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मेनान्डर मिडिया सर्व्हिसेसचे जयपाल वाघमारे यांनी एलईडी वॉल व्हॅन उपलब्ध करून दिली आहे. किनवट - माहूर तालुक्यातील 220 गावात हा चित्ररथ जाणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी