भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका-भिंतीपत्रिकेचे विमोचन संपन्न -NNL


नांदेड|
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका व भिंतीपत्रिकेचे विमोचन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत नुकतेच करण्यात आले. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत येणाऱ्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला येत्या 16 जुलै रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन यंत्रणेच्या वतीने लिखित भूजल पुनर्भरण माहिती घडीपत्रिका व भिंतीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. 


यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुशीलाबाई हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, समाज कल्याण समितीचे सभापती ॲड रामराव नाईक, शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे, जलव्यवस्थापन समिती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर, प्रणिताताई देवरे-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड, आर. व्ही. पवार, श्रीमती पी. सी. जंजाळ, श्रीमती पोपलाईकर, श्री. भवानकर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


भूजल विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सहसंचालक डॉ. पी. एल. साळवे, उपसंचालक बी. एम. मेश्राम यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्ह्यातील पदवी व  पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या भूगर्भशास्त्र, भूगोल, कृषी अभियांत्रिकी, कृषी, बांधकाम विभाग याविषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच गावपातळीवरील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, जलसुरक्षक, राष्ट्रीय सेवायोजना व नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, महिला बचत गट, भूजल वापरकर्त्यांना विशेष करून जिल्ह्याची, तालुक्याची, गावाची भूजलाची परिस्थिती, जलचक्र, भूजल उपलब्धता, भूजलाचे पुनर्भरण, भूजलाची गुणवत्ता व भूजलाचे व्यवस्थापन, भूभौतिक पद्धतीने भूजलाचे संशोधन आणि व्यवस्थापन, पारंपारिक व अपारंपरिक उपाययोजना भूजल विषयक जनजागृतीसाठी आदी विषयावर ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन करण्यात आले. 


प्रत्यक्षात नवीन बांधकामे, पेट्रोल पंप, मोठे धाबे, हॉटेल, कृषी साहित्य दुकाने, बाजार समिती, शेतीशी निगडीत सेवा दुकाने व बांधकाम साहित्य दुकाने या ठिकाणी विहीर व विंधन विहिरी पुनर्भरणाचे महत्व व त्याचे फायदे याचा प्रसार केला आहे. विविध संवर्गातील भूजल वापरकर्त्यामध्ये भूजला बद्दल जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुमारे 11 वेबिणार घेण्यात आले असून हे या पुढेही चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले, अशी माहिती भूजल विकास यंत्रणेकडून देण्यात आली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी