प्रथम डोक्यात गोळी डागली, नंतर तलवारीने केले वार
नांदेड। शहरात मागील काही वर्षांपासून गुंडगिरी चालूच आहे. त्यामुळे अनेकदा गोळीबार होण्याचे प्रकार घडले आहेत, मात्र यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अपयशी होत आहेत. काल पुन्हा शहरात गँगवार भडकला आणि एका गुंडाची डोक्यात गोळी घालून त्यानंतर तलवारीने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी विक्की ठाकूर नामक गुंडाची हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील गाडीपुरा भागात घडलेली घटना ही गॅंगवार मधून घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मयत विक्की ठाकूर हा देखील गुंड प्रवृत्तीचा होता. त्यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात पाच गंभीर असे गुन्हे दाखल आहेत. मयत विक्की ठाकूर काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता.
मागील वर्षभरापूर्वी नांदेडमध्ये विक्की चव्हाण नावाच्या गुंडाचा देखील अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. कैलास बिगानिया नामक गुंडाने आपल्या अन्य साथीदारासह विक्की चव्हाणचा खून केला होता. विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा खास साथीदार होता. मंगळवारी रात्री विक्की ठाकूर गाडीपुरा भागात आपल्या घराजवळ थांबला असताना दोन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. नेम चुकल्याने विक्की ठाकूर सुसाट धावला. मात्र दुचाकीवरून आलेल्यानी त्याचा पाठलाग केला, विक्की ठाकुरवर झाडलेल्या तीन गोळ्यापैकी एक गोळी डोक्याला लागली.
आणि तो जागीच ठार होऊन धारतीर्थ पडला. नंतर आरोपींनी हवेत गोळीबार करून दहशत पसरवली. हे टोळके एवढ्यावरच थांबले नाहीतर जमिनीवर पडलेल्या विक्की ठाकूरच्या शरीरावर आरोपींनी तलवारीचे अनेक वार केले. विक्की ठाकूरचा खात्मा झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपी येथून पसार झाले. या घटनेनंतर शहरभर वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत. परिसरात एकच दहशत पसरली असून, धावपळ उडाली होती.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कुख्यात गुंड कैलास बिगनीया याचा भाऊ नितीन बिगानीया, गंगाधर बोकारे यांच्यासह अन्य गुंडांनी विक्की ठाकूर याची हत्या केली असा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत असून, शहरातील त्या भागात तणावपूर्ण शांतता आहे.
