सामाजिक कार्यकर्त्या एँड. कु.सुरेखा एडके यांचे निधन -NNL


नायगांव बा./नांदेड|
लढावू सामाजिक कार्यकर्त्या एँड.कु.सुरेखा जळबाजी एडके (वय ४४ वर्ष) यांचे दि.२० जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर नांदेडच्या सिडको येथिल वैकुंठधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात आज दि.२१ जुलै रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

नायगांव तालुक्यातील बरबडा येथील मूळच्या रहिवासी असलेल्या कालवश कु.सुरेखा एडके यांनी घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने बालपणापासूनच गांवात व नंतर,नांदेड येथेही स्वतः छोटे व्यवसाय करितच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन बि.ए.एल.एल.बी.चे शिक्षण पुर्ण करुन एल.एल.एम. साठीही प्रवेश घेतला होता. त्याचबरोबर,सुविधा मल्टिसर्व्हिसेस नांवाचा व्यवसायही वाडेकर हॉस्पिटल कॉम्प्लेक्स,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नांदेड या ठिकाणी सुरु केला होता. स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या सर्व कुटूंबिय,नातलग, आप्तस्वकियापाठोपाठ सर्वसामान्य जनता व विविध क्षेत्रातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.

त्यांचा भार सोसीत व्यवसाय सांभाळून उच्चशिक्षण घेतच त्यांना धार्मिक,सामाजिक कार्यासह महिला सक्षमीकरण कार्याचीही ओढ होती.सिडको येथिल माता रमाई आंबेडकर चौकाच्या उभारणी लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता यासाठीच्या आंदोलनात त्या अग्रक्रमी असल्याने त्यांनी कारावासही भोगला होता.माता रमाई चँरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा व यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या यशस्वीपणे पदभार सांभाळत होत्या.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेकस्तरावरुन विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. कालवश कु.एडके यांच्या पश्चात आई अनुसया,३ भाऊ बाबाराव,प्रभाकर,भगवान तसेच,एक बहिण आदी परिवार आहे. त्यांच्या निधनाने भिमवाडी, सिडको व बरबडा परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैकुंठधाम स्मशानभूमी येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी संविधान हक्क परिषदेचे भि.ना.गायकवाड, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, माहिती अधिकार तपास समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय अनंतवार, नायगांव पंचायत समितीचे मा.उपसभापती माधव गजभारे,प्रजापथचे संपादक विक्की टाकळीकर,मारोती बचाटे पाटील, भवनकर काका, बालाजी चौहान,अमृत नरंगलकर, मंगेश हुंडेकर, राजू लांडगे,गजानन कहाळेकर, एँड.दिलीप गंगातिर, एँड.जेठेवाड,विजया काचावार, सरिता गच्चे, रंजना लांडगे, पत्रकार शिवाजी राजूरकर, संदिप साखरे,जगदीश भुरे, नामदेव पद्मणे,शशिकांत हाटकर, एम.डी.मुजीब,शाहिर बापूराव जमधाडे, विजय राजे पाटील ईस्लापूरकर आदींसह बरबडा,भिमवाडी,सिडको,नांदेड परिसरातील सामाजिक, राजकीय व महिला कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी