आषाढी निमित्ताने हिमायतनगरात खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीसह कोरोना मुक्तीची प्रार्थना
हिमायतनगर| यंदाचा खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीचा होओ, पाऊस पाणी होऊन दुष्काळाची छाया दूर व्हावी.... तसेच जगावर ओढवलेले हे कोरोना महामारीचे संकटातून मुक्ती मिळावी ... अशी प्रार्थना करून भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे मुख दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला - पुरुष भक्तांनी आषाढी एकादशी उत्सवा निमित्ताने टाळ - मृदंग आणि विठू नामाच्या गजरात शहराला नगरप्रदक्षिणा घालून पंढरपूरच्या पाई वारीचा आनंद घेतला आहे.
संजू ठाकरे यांनी आषाढी एकादशी निमित्ताने हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी उपवासाच्या फराळाचे वितरण करून श्री विठ्ठलाच्या चरणी माथा टेकला आहे, तसेच देशावर आलेलं कोरोनाच संकट टळू दे....यंदा चांगला पाऊस होऊन बळीराजाच्या उत्पन्नात भरभराटी येऊ दे... अशी कामना त्यांनी केली आहे, -NNL
श्रीक्षेत्र असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर व बोरगडी येथील विठ्ठल मंदिरात पंढरपूर यात्रा आणि आषाढी एकादशी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. मात्र गतवर्षीपासून कोरोना महामारीचे संकट ओढवल्याने या महामारीचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने सर्व धार्मिक स्थळे बंद केली आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा वारकरी, संप्रदायातील भाविक भक्तांना साध्या पद्धतीने आषाढी उत्सव साजरा करावा लागला आहे. परमेश्वराचे मुख्य मंदिर बंद असलेतरी मंदिराच्या आवारातील मोकळ्या जागेत चार दिवसापासून अखंड विना पारायण, हरिपाठ केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत सुरु आहे. बोरगडी येथील मंदिरातही सोशल डिस्टन्स ठेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार विठ्ठल रुखमाईची पूजा करण्यात आली आहे. दि.२० जुलै आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदायीक महिला - पुरुष, बालकांनी विठ्ठल नामाचा गजर करीत बाहेरूनच श्रीचे दर्शन घेतले आहे. तसेच हिमायतनगर येथील भजनी मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या नगर प्रदक्षिणा दिंडीत मोजक्याच महिलांनी सहभाग घेऊन अनादिकालापासून चालत आलेली परंपरा खंडित होऊ न देता विठू नामाचा गजर करीत, टाळ - मृदंगाच्या वाणीत पूर्ण केली आहे.
दरम्यान शहराच्या गावाबाहेरील व शहरातील सर्व मंदिरातील देवी - देवतांचे मंदिराबाहेरून दर्शन घेऊन पंढरपूर यात्रेला गेल्याचा काहींसा अनुभव दिंडीत सामील झालेल्यांनी घेतला आहे. पावसातही टाळ -मृदंगाच्या गजरात व भजनी मंडळाच्या आवाजाने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आषाढी एकादशी दिनी नगर प्रदक्षिणा काढण्याची हि परंपरा मागील शेकडो वर्षापासून मंदिर समितीच्या पुढाकारातून अविरतपणे सुरु असून, भजन गीते व प्रसाद वाटपाने दिंडीचा समारोप श्री परमेश्वर मंदिरात परत येउन करण्यात आला आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी शोभा यात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून ढोल - ताश्याच्या गजरात काढण्यात येउन, महाप्रसाद, अन्नदानाच्या पंगतीने समारोप केल्या जाणार आहे.