निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज- भदंत पंय्याबोधी थेरो -NNL

श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रम ; भिक्खू संघाने दिली पर्यावरण संवर्धनाची शपथ



नांदेड| बौद्ध धम्मात वृक्षांना फार महत्त्व आहे. बुद्धाचा जन्म लुंबिनी वनात झाला. बुद्धाने गृहत्याग केल्यानंतर संबंध आयुष्य वनातच घालविले. दिव्यज्ञानाची प्राप्तीही बुद्धगया येथे विशाल बोधीवृक्षाखाली झाली. बुद्धाने पहिला धम्मोपदेश पंचवर्गीय भिक्खूंना मृगदायिनी वनातच दिला. मानवी जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असल्याचे मत धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी व्यक्त केले. झाड तोडण्याआधी झाडे लावण्याचा विचार केला पाहिजे. वर्षभरात एक व्यक्तीने पाच झाडे लावावीत आणि ती जगवावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तालुक्यातील तालुक्यातील ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्राच्या पार्किंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न,भंते चंद्रमणी, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते शिलानंद, भंते सुनंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुदत्त, भंते सुजात, भंते शिलभद्र, भंते सुगत या भिक्खू संघासह धम्मसेवक गंगाधर ढवळे, मधूकर जोंधळे, प्रतिभा जोंधळे, हर्षदा जोंधळे, अमित जोंधळे, सूरज नरवाडे, अनिता नरवाडे, सागरबाई नरवाडे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप व पुष्पपूजन संपन्न झाल्यानंतर बुद्ध वंदनेनंतर वृक्षारोपण कार्यक्रमास सुरुवात झाली. 

प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर वृक्षसंवर्धनाची जबाबदारी निश्चित करुन प्रत्येकी एक वा दोन झाडांच्या संगोपनाची व काळजी घेण्याचे ठरले. प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे जनतेला झाडे लावण्याबाबत आणि जगविण्याबाबत आवाहन केले. यावेळी उपस्थित झालेल्या जोंधळे परिवाराने पस्तिसाव्या मंगल परिणय दिनानिमित्त होणारा खर्च टाळून खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी भिक्खू संघाला धान्यादी वस्तूंसह पाच हजार रुपयांचे आर्थिक दान दिले. त्यानंतर भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. 

अशी घेतली प र्यावरण संवर्धनाची शपथ


 "आम्ही पाच जून पर्यावरण दिनानिमित्त अशी शपथ घेतो की, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वर्षभरात पाच ते दहा झाडे लावू. कोणत्याही परिस्थितीत हिरव्या झाडांवर कुऱ्हाड चालवणार नाही. वृक्षसंवर्धनासाठी व जनजागृतीसाठी पुढाकार घेऊ. परिसर प्रदुषित होईल असे कोणतेही कृत्य आमच्या हातून होणार नाही. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप थांबवण्यासाठी जागरुकता निर्माण करु. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्रयत्न करु. स्वतः झाडे लावून इतर दोघांना आणि त्या दोघांनी प्रत्येकी दोघांना झाडे लावण्यास व वृक्षसंवर्धनास प्रवृत्त करु‌."

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी