मार्केटचा कायदा... हिमायतनगरात फक्त व्यापाऱ्यांचाच फायदा...! शेतकऱ्यांचा आरोप

हिमायतनगर (अनिल मादसवार) स्थानिक व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांच्या मालाची कवडीमोल दराने कापूस व सोयाबीनची खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्याकडून प्राप्त होत आहेत. व्यापार्यांनी हमीभावाने खरेदी करून शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक व सचिवांचा असताना याकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांना अभय देत असल्याचा संतापजनक भावना शेतकरी नागरीकातून व्यक्त होत आहेत. त्यामुळे मार्केटचा कायदा.... शेतकऱ्याचा फायदा हे ब्रीद आता केवळ व्यापाऱ्यांच्या हितापुरते उरला कि काय..? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे या वर्षीच्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अगोदरच अस्मानी संकटाचा सामना करताना बेजार झालेल्या बळीराजा आता व्यापार्यांच्या सुलतानी कारभाराचा बळी ठरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने या लुटारू व्यापार्यांना पाठीशी न घालता शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बिट पद्धतीने योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लालची प्रशासक व सचिवांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या व्यापार्यांना पाठीशी घातले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखरेखीखाली शहरात शेकडो भुसार आडत दुकाने चालविली जात आहेत. यापैकी ग्रामीण भागात फिर्नार्याकडे पर्वाचा नसताना सुद्धा शेतीमालाची खरेदी केली जात आहे. सध्या शेतातून निघालेला सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, ज्वारीसह अन्य शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. व्यापारी मात्र शेतकऱ्यांच्या गर्दीचा फायदा घेत आडत, हमाली, कट्टी, पोत्याची कट्टी, मायचार व किडलेला, मातीमिश्रित, बारीक माल असल्याची बतावणी मनमानी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. खरे पाहता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी केल्यानंतर त्याची पक्की पावती देणे बंधनकारक आहे. परंतु शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यावर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पक्की पावती न देता एका सध्या कागदावर शेतकऱ्यांचा माल मोजून व्यवहार करत आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असून, महसूल बुडत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती डबघाईस येऊ लागली आहे. खरे पाहता शासनाच्या नियमानुसार व्यापाऱ्यांनी शेकडा 01 रुपये 05 पैसे टैक्स कृषी उत्पन्न बाजार समितीला देणे बंधनकारक आहे. परंतु असे ना करता थेट कृषी उत्पन्न बाजार समितीतून स्वतःकडे पावती बुक घेऊन कर बुडवत आहेत. तसेच 10 ट्रक पास झाले कि एक पावती फाडून केवळ एका ट्रकला 630 रुपये टैक्स भरणा करत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक - सचिवांनी व्यापाऱ्यांना अभय दिल्यामुळेच हिमायतनगर तालुक्यात हा प्रकार चालविला जात असून, यावर जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शासन नियमाप्रमाणे शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्यांना पक्की पावती द्यावी. व्यापाऱ्यांच्या मालाच्या ट्रकचा कर वसुली न करता थेट पक्क्या पावत्यावर मालाची खरेदीवर शासन नियमाप्रमाणे टैक्स वसूल करण्यात यावा. आणि शेतकऱ्यांच्या मालाची बिट पद्धतीने खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी शेतकरी, सुजाण नागरीकातून केली जात आहे. 

अन्यथा हक्काच्या मालाच्या भावासाठी रस्त्यावर उतरावे लागेल
----------------------
कृषी उतपन्न बाजार समितीचा कारभार पाहणाराकडून स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा बळी दिल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. या गलथान कारभार विषयी अनेक शेतकरी संताप व्यक्त करत असून, शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांनी हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या व्यापार्यांवर अंकुश ठेवावे. शासनाने जाहीर केलेला हमी भाव तुटपुंजा असल्याने सोयाबीन ५ हजार तर कापूस ७ हजार दराने खरेदी करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करून कर्ज माफी द्यावी, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट हेक्टरी ५० हजाराची मदत द्यावी अन्यथा हक्काच्या मालाला भाव मिळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शेतकरी वर्गातून पुढे येऊ लागला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी