हिमायतनगरात शुद्ध पेयजलाच्या नावाने अशुद्ध पाण्याचा गोरखधंदा

अशुध्द पाणी विकणाऱ्यावर कार्यवाही होणार का? 
हिमायतनगर(प्रतिनिधी)शहरात गेल्या काही वर्षांपासून फिल्टर्ड शुध्दपाणी विकण्याचा व्यवसाय जोमात चालविला जात असून, मिनरलच्या नावाखाली अशुद्ध पाणी देऊन ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे. या प्रकाराकडे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, नगरपरिषद आणि संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मिनरल वॉटरच्या नावाखाली पाण्याचा धंदा करणार्यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविल्याने अनेकांना
आजराचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे अन्न औषध प्रशासन, जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ थांबवावा अशी मागणी केली जात आहे. 

मागील काही महिण्यापासुन अनेकांनी शहरातील जनतेला शुध्द पाणी करून विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे आजार लक्षात घेवुन अरोग्याला जपण्यासाठी हिमायतनगर  आणि परीसरातील नागरीकांनी वाँटर प्लांट मधुन २० लिटरची कँन विकत घेऊन तहान भागवीत आहेत. परंतु आपण पित आसलेले पाणी खरोखरच शुध्द आहे का ? वाँटर प्लाँटधारकांनी आवश्यक त्या संबंधितांची परवानगी घेतली का, त्यांच्याकडे पाणी तपासणी होते का? यासह अन्य बाबीची माहिती न घेता विश्वास ठेवुन शुध्द पाण्याच्या नावाखाली अशुध्द पाणी शहरीरात जात आहे.  वॉटर प्लांटधारक ग्रामीण रूग्णालयातीळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून शुद्ध पाणी असल्याचे सांगत असले तरी मिनरल वाँटर प्लाँट मशीनमध्ये पाण्याची चव बदलण्यासाठी केमिकलचा वापर केला जात असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ पाण्याचा धंदा करून आपली तुंबडी भरण्याच्या उद्देशाने वाँटर प्लाँटच्या पाण्याचा धंदा राजकीय वरदहस्ताने चालविला जात असल्याचे शुद्ध पाणी पिल्यानंतरही रुग्णालयाची वाट धरणाऱ्या नागरीकातून केला जात आहे. 

खरे पाहता पाणी विकण्याचा परवाना म्हणजे (आय.एस.एस. व एफ.एस.एस.ए.आय.) काढूनच पाणी विक्री करता येते. परंतु कोणताही परवाना नसलेल्या प्लॅन्टमधून अशुद्ध व विनाचाचणीच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. यामुळे अनेकांना घशांचे विकार, पोटाचे, थॉयरॉइडचे आजार जडले आहेत. परवाना नसलेले विक्रेते पाण्यावर कोणती प्रकिया करतात? त्यासाठी कोणते यंत्रणा आहे हे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. जमिनीच्या पोटातून बेसुमार उपास करून आरोग्याला घातक असलेली रसायने, सूक्ष्म जीव असलेले पाणी कोणतीही तपासणी न करता कोणत्यातरी मशीनद्वारे शुद्ध करून विक्री करत आहेत. पाणी शुद्ध होते किंवा नाही यासाठी पाणी तपासण्याची प्रयोगशाळा व तंत्रज्ञ प्लॅन्टधारकांकडे नसल्याने काही खाजगी लोकांनी नागरिकांची गाजर लक्षात घेऊन पाण्याचा धंदा चालविला आहे.

हिमायतनगर शहरात चार वॉटर प्लांट असताना हिमायतनगर नागरपंचायतीकडे केवळ दोनच वॉटर प्लांटची नोंदणी करण्यात आली आहे. आरोग्य प्रशासनही प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने शुद्ध पेयजलाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याचा खेळ चालविला जात आहे. या प्रकाराकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शहरातील खाजगी वाँटर प्लाँटची चौकशी होऊन शुध्द पाण्याच्या नावाखाली अशुध्द पाणी विकणाऱ्या चालकांविरूध्द कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे. 

संबंधित विभाग अनभिज्ञ 

शुध्द पाणी करुन विकण्याचा व्यवसाय सुरू करताना शहरातील किती वाँटर प्लाँट चालकांनी कुठली परवानगी घेतली आहे. याबाबत संबंधित विभागास माहिती नसल्याचे दिसुन येत आहे. नगरपरीषद आणि अन्नभेसळ प्रशासन विभागाकडे याची नोंदच नसल्याचे पुढे येऊ लागल्याने हिमायतनगर शहरातील पाणी विक्रेंत्यावर कोणाचे अंकूश आहे हे कळायला मार्ग नसल्याने पैसे देऊन स्वतःचे आरोग्य धोक्यात घालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी