संगीतशंकर दरबार

डॉ.राम देशपांडे यांची दमदार मैफल


नांदेड(प्रतिनिधी)गुरुवारी सायंकालीन सत्राचा समारोप डॉ.राम देशपांडे यांच्या दमदार मैफिलीने झाला. परिपूर्ण गायकीचा प्रत्येय नांदेडकरांनी घेतला. प्रांरभी संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा कार्यक्रमाचे संयोजक अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार डी.पी.सावंत, नरेंद्र चव्हाण, गुलाबराव भोयर, शिलाताई भोयर, किशोर पाटील, पुष्पा पाटील, पं.नाथराव नेरलकर, सुनिल नेरलकर यांची उपस्थिती होती. 

उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमानंतर राम देशपांडे यांनी गायला सुरुवात केली. प्रारंभी त्यांनी यमनकल्याण राग सादर केला. जिया मानतनाही या विलंबित ख्यालात संथ पध्दतीने आलापी करीत रागाचे प्रस्तुतीकरण केले. त्यानंतर त्यांनी गायलेला तराना श्रोत्यांच्या पसंतीला उतरला. सोहनी रागातील ‘जियरारे’ही बंदीश त्यांनी अतिशय आर्ततेतून सादर केली. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली सावरीया या ठुमरीने श्रोत्यांना आनंदीत केले. या भवनातील गित पुराणे हे नाट्यगित व त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा भैरवीत आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना हा अभंग सादर केला. मैफिलीला साथसंगत अजय जोगळेकर (हार्मोनियम), स्वप्नील भिसे (तबला) यांची होती. कार्यक्रमा दरम्यान त्या दोघांची झालेली जुगलबंदी टाळ्या मिळवून गेली. डॉ.राम देशपांडे यांच्या मैफिलीपूर्वी महेंद्र टोके यांचे गायन झाले. त्यांनी पुरीयाकल्याण हा राग सादर केला. त्यांना साथसंगत जयंत नेरळकर, शशांक शहाणे यांची होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.विश्वाधार देशमुख यांनी तर आभार सुनिल नेरलकर यांनी मानले. डॉ.राम देशपांडे यांची जोरकस मैफल नांदेडकरांच्या कायम स्मरणात राहिल, हे मात्र निश्चित. 

दक्षिणकाशीत नाममहिमेचे गायन


नांदेड(प्रतिनिधी)श्री गुरुगोविंदसिंघांच्या पावन भूमीत शुक्रवारी पहाटेच्या मैफिलीत संत नामदेवांच्या चरित्राचे गायन झाले. सुप्रसिध्द गायक रघुनंदन पणशीकर, गायिका अंजली मालकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. पं.विकास कशाळकर, मास्टर कृष्णाराव यांनी संगीतबध्द केलेली नामदेवांवरील अभंग त्यांची चरित्रगाथाच होती.

 प्रथम नमन करु गननाथा या नांदीने सुरु झालेल्या कार्यक्रमाची सांगता विठ्ठलाच्या पारंपारिक आरतीने करण्यात आली. शिंपीयाच्या कुळी जन्म माझा झाला हा अभंग रघुनंदन पणशीकर यांनी सादर केला. अनंत रुपाचे सागर हा पुरीया धनश्री रागातील अभंग दाद मिळवून गेला. श्रीमुख साजिरे, कुंडलेगोमटी, एके हाती टाळ, एका हाती दिंडी हे अभंग अंजली मालकर यांनी गायिले. जय जय राम कृष्णहरीचा गजर करण्यात आला. अंजली मालकर यांनी गायिलेली परब्रम्ह निष्काम तो हा ही गवळण अतिशय वेगळ्या ढंगाची होती. निवेदक गजानन परांजपे यांनी संत ज्ञानेश्वर समाधीचा प्रसंग वाचिक अभियनाव्दारे साकारला. रघुनंदन पणशीकर यांनी ‘मै अंधुलेकी टेक, तेरा नाम खुंदकारा’ही संत नामदेवांची पंजाबी भाषेतील रचना रघुनंदन पणशीकर यांनी अतिशय तन्मयतेने सादर केली. प्रेमर्ंिपसे पडले अंगी, तिने छंदे नाचू रंगी हा नामयाचा अभंग मालकर यांनी गायला. अवघाच संसार करीन सुखाचा, जरी झाला दुःखाचा दुर्धर हा भैरवी रागातील या अभंगानंतर पांडूरंगाची पारंपारिक आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी