नांदेड| जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनात जिल्ह्यात अधिनस्त संस्थाना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण 5 लाख 9 हजार 950 लसमात्रा वाटप करण्यात आली आहे.
यापैकी 4 लाख 14 हजार 121 लसीकरण पूर्ण झालेले आहे. पशुपालकांनी गोवंशीय सशक्त गाभण जनावरांना तसेच वासरांना लम्पी चर्मरोग प्रतिबंधासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून लसीकरण करुन घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम.आर. रत्नपारखी यांनी केले आहे.
पशुपालकांमध्ये जनजागृतीचे कार्य पशुसवंर्धन विभागामार्फत युध्दस्तरावर सुरु करण्यात आलेले आहे. प्राण्यांमध्ये संक्रामक व सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये महाराष्ट्र राज्य हे नियंत्रितक्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या व्हर्जन-3.0 दिनांक 26/9/2022 च्या मार्गदर्शक सुचनामधील मुद्दा 11 नुसार सशक्त गाभण गाईना लसीकरण करुन घेण्यात यावे.
तसेच मुद्दा क्र. 7 प्रमाणे वासरामध्ये लसीकरण करताना, ज्या जनावरांना वासराचा जन्म होण्यापुर्वी लसीकरण केलेले आहे त्याच्या वासरांना लसीकरण करण्याची गरज नाही. परंतु ज्या जनावरांना वासरु जन्मा पुर्वी लसीकरण करण्यात आलेले नाही त्यांच्या वासरांना ती कोणत्याही वयाची असली तरी त्यांचे लसीकरण करुन घेण्यात यावे, असेही पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले आहे.