नांदेड। जन्मानंतर वेळीच निदान व उपचार केल्यास दिव्यांगत्वाची तीव्रता कमी होत असल्याचे प्रतिपादन कंपोझीट रिजनल सेंटर नागपूरचे सहाय्यक प्राध्यापक जगन मुगदडे यांनी केले आहे.
कंपोझीट रिजनल सेंटर नागपूर, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग व राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सोमवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी क्रॉस डीसएबीलीटी अर्ली इंटर्वेंशन (शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप) या विषयावर मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक प्राध्यापक जगन मुगदडे बोलत होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी राजू एडके, विशेष समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी बापू दासरी, राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रकाश मालपाणी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, डॉ. आशिष अग्रवाल, डॉ. गोपिका मालपाणी, डॉ. क्षितिज निर्मल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना मुगदडे म्हणाले की, बहुतांश पालक आपला मुलगा दिव्यांग असल्याचे मान्य करण्यात विलंब लावतात. यातून दिव्यांगत्वावर उपचार करण्याची वेळ निघून जाते व त्या मुलास कायमचे अपंगत्व येते. यासाठी भविष्यात असे होऊ नये यासाठी किमान दिव्यांग क्षेत्रात प्रत्येकांनी आपले कर्तव्य समजून अशा पालकांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. ० ते ६ हा बालकांच्या विकासाचा महत्वाचा टप्पा आहे. या काळात दिव्यांगत्वाचे निदान झाल्यास दिव्यांगत्वावर मात अथवा किमान दिव्यांगत्वाची तीव्रता निश्चित कमी करता येते. या समवेतच नजीकच्या नात्यात विवाह, अनुवंशिकता हेही दिव्यांगत्वाचे कारण आहे. शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेप यातून विदेशात अपंगत्वाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. आपल्या देशातही दिव्यांगत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी जि.प. चे समाजकल्याण अधिकारी राजू एडके म्हणाले की, दिव्यांगांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना व कायदे करण्यात आले आहेत मात्र याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या लाभापासून अनेक दिव्यांग बांधव वंचित राहतात यासाठी कायदे केवळ कागदावरच राहू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याप्रसंगी विशेष समाज कल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी बापू दासरी यांनी दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानीच समर्पित भावनेने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी शीघ्र ओळख व शीघ्र हस्तक्षेपाची गरज यावर विचार मांडले. डॉ. आशिष अग्रवाल यांनी शीघ्र हस्तक्षेपात बालरोगतज्ञांची भूमिका यावर, डॉ. गोपिका मालपाणी यांनी शीघ्र हस्तक्षेपात फिजिओथेरपिस्टची भूमिका तर डॉ. क्षितिज निर्मल यांनी वाचा उपचार तज्ञांची भूमिका यावर विचार मांडले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी क्रॉस डीसएबीलीटी अर्ली इंटर्वेंशनची माहिती दिव्यांग प्रवर्गाच्या सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक आहे. यामुळे ही उपयुक्त माहिती दिव्यांग मुलांच्या पालकांपर्यंत पोचल्याने भविष्यात दिव्यांगावर मात करण्यात निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक मुरलीधर गोडबोले यांनी केले. या कार्यशाळेस श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालय, आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय सह जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती होती.