नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. २९ ऑगष्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील शारदा भवन हायस्कूलचे जेष्ठ व माजी शारीरिक शिक्षक डी. व्ही. देशमुख यांचा त्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या अमुल्य योगदानाचा गौरव म्हणून सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचे नावाजलेले क्रिकेट खेळाडु व व्यावसायिक रमेश मेगदे यांचाही क्रीडा क्षेत्रातील उलेखनीय कार्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती. या क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रिकेट व वेटलिफ्टिंग च्या सामन्याचे आयोजनही करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, खेळाला खेळतांना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन खेळले पाहिजे. तसेच प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी क्रीडा व खेळ हे तपस्या आहे. मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनात सतत सराव करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सिंकू कुमार सिंह यांच्यासमेवेत डॉ. नीलकंठ श्रावण, डॉ. पारस यादव, डॉ. नागेश फुलारी, प्रा. सिसोदिया, वेटलिफ्टिंग मार्गदर्शक स. परमज्योतसिंघ सिद्धू व अनेक खेळाडू मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी केले.