मुंबई| भारतीय परंपरेत अग्रपूजेचे स्थान असलेल्या बुद्धीदेवता श्रीगणेशाच्या उत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव जोरदार साजरा करतानाच पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ब्रिटीश राजवटीत समाजमन जागृत करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज केवळ राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात आणि विदेशातही गणेशोत्सव साजरा केला जातो.
या निमित्ताने महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख देश-विदेशात पोहोचली, ही अभिमानाची बाब आहे. सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना आपले सामाजिक दायित्वाचे पालन करण्याची परंपराही जोपासावी, गणरायाच्या आगमनाने वातावरणात उत्सव आणि आनंदाला भरते येत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये, याची काळजीही सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.