' एक कवी, एक भाषा ' उपक्रमांतर्गत व्याख्यानास प्रतिसाद
पुणे। रसिक मित्र मंडळातर्फे ' एक कवी, एक भाषा ' उपक्रमांतर्गत 'पद्मश्री नामदेव ढसाळ ' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . अध्यक्षस्थानी रसिक मित्र मंडळाचे संस्थापक सुरेशचंद्र सुरतवाला हे होते .हा कार्यक्रम पत्रकार भवन, नवी पेठ येथे शुक्रवार,८ जुलै रोजी,सायंकाळी सहा वाजता झाला. प्रदीप निफाडकर यांनी प्रास्ताविक केले. ' एक कवी, एक भाषा ' या उपक्रमातील हे ६९ वे पुष्प होते.
अरूण खोरे म्हणाले, 'नामदेव ढसाळ हे वादळ होते. लेखन, व्याख्यानाच्या निमित्ताने आमच्या भेटी होत होत्या. अमेरिकेतील ब्लॅक पॅंथरच्या नंतर महाराष्ट्रात दलित पँथर ची स्थापना झाली. त्या काळात दलितांवर अत्याचार वाढले होते. जागे झालेल्या दलित तरुणांमधून पँथरच्या छावण्या उभ्या राहिल्या.
त्यांच्यावर कार्ल मार्क्स, डॉ.आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांचा प्रभाव होता. त्यांच्या कविता पारंपारिक कविता संकल्पनांच्या कानशीलात मारणाऱ्या होत्या. त्याच काळात दलित साहित्यिकांची पिढी आली होती. मध्यमवर्गीय मराठी वाचकांचे लक्ष उशीराच गेले.'गोलपीठा ' काव्यसंग्रहाचे भाषांतर तेव्हा ताबडतोब झाले असते तर नोबेल पारितोषिक मिळाले असते. ढसाळांचे शब्द महाराष्ट्राला उशीरा कळले.प्रस्थापित, परंपरावादी,सनातन प्रवृत्तींवर ढसाळ यांनी कोरडे ओढले.
महाराष्ट्रातील वर्चस्ववादी काँग्रेसी राजकारणात आमदारकीची संधी ढसाळांना मिळाली नाही. त्यांचा जीवनप्रवास पाहता ते विसाव्या शतकातील महान कवी ठरतात, फक्त त्यांच्या अधोविश्वावरील कविता वाचण्यासाठी आपला अभ्यास असायला हवा. त्यांची कविता त्यांच्या व्यक्तीमत्वापासून, राजकारणापासून, चळवळीपासून वेगळी करता येणार नाही. जागतिक साहित्यात मराठी साहित्याचे स्थान निर्माण होण्यात ढसाळांच्या कवितांचा वाटा मोठा आहे.संसदीय राजकारणामुळे त्यांची कविता मागे राहिली, हे दुःख आहे. अनेक गटांनी त्यांच्या राजकारणाचा, नावाचा गैरफायदा घेतला, असेही अरुण खोरे यांनी सांगीतले.