नांदेड। सातत्याने आणि तेवढ्याच कसदारपणे लेखन करणारे लेखक आनंद कदम यांचा 'वटभरणाच्या रात्री' हा ग्रामीण जीवनावरील एक सुंदर कथासंग्रह होय असे उद्गार प्रसिद्ध विचारवंत-साहित्यिक दा. मा. बेंडे यांनी काढले.
इसाप प्रकाशनाने प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या आणि आनंद कदम लिखित 'पोटा-देठातील हायकू' व 'वटभरणाच्या रात्री' या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दा. मा. बेंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. जगदीश कदम, प्रा. डॉ. भगवान अंजनीकर, तुकाराम खिल्लारे व लेखक आनंद कदम हे उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रकाशक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर वरील दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आनंद कदम यांनी मनोगत व्यक्त करतांना लिहिण्यामागची प्रेरणा व भूमिका सांगितली.
पुढे बोलताना बेंडे म्हणाले की, शेतकरी, स्त्रिया, गावातील लोक यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या भावभावनांच्या प्रसंगाच्या अंतर्मुख करणाऱ्या कथा यात आहेत. स्वभाव, परिस्थिती आणि नियती यावर माणसांचे यश- अपयश अवलंबून असते. यापुढे काही काही वेळेला काहीही चालत नाही असेही त्यांनी म्हटले. हायकू काव्यसंग्रहाचेही त्यांनी कौतुक केले.
प्रा डॉ. जगदीश कदम म्हणाले की, लेखक आनंद कदम हे आपल्या कथांमधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात. कुठल्या तरी ध्येयाने प्रेरित झालेली पात्रे कथांमध्ये आहेत. भाषेच्या अंगानेही या कथा उजव्या आहेत. या कथा कल्पना विलासातल्या नाहीत तर वास्तवातल्या आहेत असेही त्यांनी म्हटले. प्रा. डॉ. भगवान अंजनीकर म्हणाले की, ग्रामीण जीवनाचे अस्सल रूप म्हणजे या कथा होत.
कथासंग्रहात वेगवेगळ्या कथा आहेत. त्यांचे विषय वेगवेगळे आहेत. प्रत्येक कथेचे ते साक्षीदारच आहेत अशा तऱ्हेने त्यांनी लेखन केले आहे असे वाटते. या कथा प्रेरणादायी आहेत असेही त्यांनी म्हटले. कवी तुकाराम खिल्लारे यांनी हायकू म्हणजे काय? हे सांगितले. हायकू हा जपानी काव्यप्रकार असून तो जगभरात मान्यता पावलेला आहे. हे सांगून त्याच्या रचनाबंधाच्या तांत्रिक बाबी सांगितल्या. निसर्ग आणि जीवनातील सुखदुःख प्रतीकात्मकरीत्या यातून व्यक्त होतात असे म्हटले. तसेच आनंद कदम यांचे हायकू पोटा-देठातून आलेले आहेत असेही त्यांनी म्हटले.
प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. नारायण शिंदे यांनी केले तर आभार रूईचे सरपंच अमोल कदम यांनी मानले. या कार्यक्रमास निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा. मा. मा. जाधव, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे, नरेंद्र नाईक, सदाशिव गच्चे, आनंद पुपलवाड, प्रा. महेश मोरे, प्रा. महेश कुडलीकर, अशोक कुबडे, डॉ. विठ्ठल पावडे, विजय बंडेवार, गिरीश कहाळेकर, प्र. श्री. जाधव, आबासाहेब कल्याणकर, बी. आर. कदम, काशिनाथ वाघमारे, लक्ष्मी पुरणशेट्टीवार, साईनाथ रहाटकर, संजय चंद्रवंशी, देवीदास कदम आदी उपस्थित होते