12 ते 18 जून या कालावधीत गोव्यात होणार्‍या दशम 'अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना'च्या निमित्ताने... हिंदु राष्ट्राचा उद्घोष -NNL


प्रस्तावना :
गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात भारताची पत सुधारली आहे. सर्वसामान्य देशप्रेमी व्यक्तीपासून उच्चपदस्थांपर्यंत अनेक जण भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत; पण हे स्वप्न सत्यात उतरणे 'धर्मनिरपेक्ष' भारतात अशक्य आहे. भारत महासत्ता अथवा विश्‍वगुरु तेव्हाच बनू शकेल, जेव्हा भारत हे एक हिंदु राष्ट्र बनेल. इस्लामी अथवा ख्रिस्ती देशांप्रमाणे हिंदु राष्ट्र ही संकुचित कल्पना नाही, तर विश्‍वकल्याणाचा विचार करणारी, प्रत्येक नागरिकाच्या ऐहिक आणि पारलौकिक उन्नतीचा विचार करणारी, ती एक सत्त्वप्रधान व्यवस्था आहे.

1. हिंदुपणाची व्यापक संकल्पना : मेरुतंत्र या धर्मग्रंथात 'हीनं दूषयति इति हिन्दुः' अशी हिंदु या शब्दाची व्याख्या केली आहे. याचा अर्थ, जो स्वतःतील हीन किंवा कनिष्ठ अशा रज-तम गुणांचा नाश करतो, तो हिंदु. अशी सात्त्विक आचरण असलेली व्यक्ती केवळ स्वतःपुरता संकुचित विचार करत नाही, तर विश्‍वकल्याणाचा विचार करते. इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत. ऋग्वेदामध्ये 'कृण्वन्तो विश्‍वम् आर्यम् ।' म्हणजे 'अवघे विश्‍व आर्य म्हणजे सुसंस्कृत करू', अशी म्हटले आहे. उपनिषदांमध्ये 'वसुधैव कुटुम्बकम्'ची संकल्पना मांडण्यात आली आहे. याचा अर्थ 'हा माझा, हा माझा नव्हे', असा विचार क्षुद्र बुद्धी असलेल्यांचा असतो. उदार चारित्र्याच्या लोकांना, तर संपूर्ण पृथ्वी हीच स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे वाटत असते.' संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये 'हे विश्‍वचि माझे घर', असे सांगितले, तर 'पसायदान' या प्रार्थनेत विश्‍वकल्याणासाठी दान मागितले. 'हिंदु राष्ट्र' ही संकल्पना याच धर्तीवर असल्याने ही संकल्पना समजून घेतली, तर हिंदु राष्ट्राविषयी नाहक घेतल्या जाणार्‍या आक्षेपांचे आपोआपच निरसन होईल.

2. हिंदु राष्ट्राची आवश्यकता : वास्तविक भारत हे एक स्वयंभू हिंदु राष्ट्रच होते. वर्ष 1947 मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यावर इस्लामवलंबियांसाठी पाकिस्तान हा देश निर्माण झाला. त्याच वेळी खरे तर उर्वरित हिंदुस्थान अर्थात् भारत हा 'हिंदु राष्ट्र' घोषित व्हायला हवा होता; मात्र तसे झाले नाही. याउलट वर्ष 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात सर्व विरोधकांना तुरूंगात डांबून घटनादुरुस्ती करून तत्कालीन काँग्रेस सरकारने 'सेक्युलर' हा शब्द राज्यघटनेमध्ये घुसडला. या 'सेक्युलर' शब्दाची अद्याप कोणतीही अधिकृत व्याख्या करण्यात आली नाही. याच 'सेक्युलर'वादाच्या नावाखाली आतापर्यंत अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, तर हिंदूंचे दमनच होत आहे. जर घटनादुरुस्ती करून भारताला अन्यायकारक पद्धतीने 'सेक्युलर' देश घोषित केले जाऊ शकते, तर पुन्हा अशीच घटनादुरुस्ती करून भारताला 'हिंदु राष्ट्र' असे का घोषित केले जाऊ शकत नाही ?

3. हिंदूंवरील वाढते अत्याचार : आज केंद्रात सत्तापालट झाला असला, तरी हिंदूंवरील आघात थांबलेले नाहीत. अनेक मुसलमानेतर युवती 'लव्ह जिहाद'ची शिकार होत आहेत. कमलेश तिवारी, चंदन गुप्ता, हर्ष यांसारख्या हिंदुत्वनिष्ठांच्या राजरोसपणे हत्या होत आहेत. तामिळनाडूतील 'लावण्या'सारख्या हिंदु युवती, महिला यांना ख्रिस्ती धर्मांतराच्या दबावामुळे जीव गमवावा लागत आहे. भारत आणि हिंदुत्व यांची अपकीर्ती करण्यासाठी 'हिजाब', 'शेतकरी आंदोलन' यांचे 'टूलकिट' वापरले जात आहे. 'थूंक जिहाद', 'नार्कोटिक जिहाद' यांसारखे नवनवे जिहादचे मार्ग तयार होत आहेत. 'कॉमेडी'च्या नावाखाली हिंदु देवतांवर अश्‍लाघ्य टीका केली जात आहे. आज 32 वर्षे उलटूनही जिहादी आतंकवादामुळे काश्मीरमधून विस्थापित झालेले काश्मिरी हिंदू काश्मीरमध्ये पुनर्स्थापित होऊ शकलेले नाहीत. कलम 370 रहित केल्यामुळे काश्मिरी हिंदूंचा काश्मीरमध्ये परतण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला असला, तरी तो अद्यापही सुरक्षित नाही, हे वास्तव आहे. हिंदूबहुल भारतात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना आळा घालण्यासाठी 'हिंदु राष्ट्र' हा एकमेव पर्याय आहे.

4. राष्ट्रावरील संकटे : आज भारतात 9 राज्यांमध्ये हिंदु अल्पसंख्य झाले आहेत. पंजाबमधून वेगळ्या खलिस्तानची, तर तामिळनाडूतही द्रविडीस्तानची मागणी होत आहे. केरळ, पश्‍चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये हिंदु धर्म आणि राष्ट्र विरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आसाममध्ये लक्षावधींच्या संख्येने बांगलादेशी घुसखोर घुसले आहेत. 'हलाल' अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून एक समांतर इस्लामिक अर्थव्यवस्था उभी करण्याचे षड्यंत्र उघडकीस आले आहे. भारताचा प्राण असलेला सनातन धर्म राज्यव्यवस्थेतून लुप्त झाल्यानेच आज ही स्थिती निर्माण झाली आहे. याच कारणांसाठी हिंदवी स्वराज्याच्या धर्तीवर हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे.

5. केवळ भौतिक विकासासह आध्यात्मिक विकासही आवश्यक : आज विकासाच्या दृष्टीने देशाची पावले पडत आहेत; पण समाजव्यवस्था आणि राष्ट्ररचना आदर्श होण्यासाठी भौतिक विकासासह आध्यात्मिक विकासही आवश्यक असतो. कोरोनाच्या काळात वैज्ञानिक प्रगतीची मर्यादा सगळ्यांनी अनुभवली. त्यामुळे शाश्‍वत विकास साध्य करायचा असेल, तर अध्यात्म आणि सनातन धर्म यांच्या आश्रयाला येण्यावाचून पर्याय नाही. धर्माधिष्ठित राज्यांची आदर्श उदाहरणे आपल्याकडे अनेक आहेत, त्यामुळे हिंदु राष्ट्र कसे असेल, याची झलक आपल्या इतिहासात पहायला मिळते. भौतिक विकास जरी झाला, तरी ज्या समाजासाठी आपण तो करत आहोत, तो समाजही उन्नत करण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत. आदर्श व्यक्तीमत्त्व साकारण्यासाठी अर्थात आदर्श समाजरचनेसाठी अर्थात भौतिक विकासासह आध्यात्मिक विकास साधण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र येणे आवश्यक आहे. या दृष्टीने सांगोपांग चर्चा करण्यासाठी, दिशा देण्यासाठी आणि कृतीशील होण्यासाठीच 'अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना'चे आयोजन करण्यात आले आहे.

6. अधिवेशनाची फलश्रुती : या हिंदु राष्ट्राची संकल्पना जनमानसापर्यंत पोचवण्यामध्ये, हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांना हिंदु राष्ट्राच्या दिशेने कृतीप्रवण करण्यामध्ये, तसेच सनातन धर्मनिष्ठ हिंदूंचे व्यापक संघटन करण्यामध्ये गेली 9 वर्षे होत असणार्‍या 'अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना'चा सिंहाचा वाटा आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अस्पृश्य असलेल्या 'हिंदु राष्ट्र' या शब्दाचा उद्घोष आज सर्वत्र होतांना दिसत आहे. ही एकप्रकारे 'अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना'ची फलश्रुती म्हणावी लागेल. आज भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला 'हिंदु राष्ट्र' घोषित करून खर्‍या अर्थाने भारताची महासत्तेकडे अर्थात् विश्‍वगुरुपदाकडे अमृतमय वाटचाल व्हावी, ही अपेक्षा !

- संकलक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, संपर्क : 99879 66666

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी