नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत वेग वेगळ्या आशय, विषय असलेले नाट्य प्रयोग पाहता येत असल्याचे समाधान रसिक प्रेक्षकांमध्ये पाहावयास मिळत आहे.
माणसाला जीवन जगत असताना मृत्यूची भीती वाटत असते. माणसाच्या मनातील भयाचे विविध कंगोरे, मृत्यू ही संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने भयरात्र या नाट्य प्रयोगात मांडण्यात आले. क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने सादर करण्यात आलेलं रविशंकर झिंगरे लिखित, सुनीता करभाजन दिग्दर्शित "भयरात्र" हे दोन पत्रांवर उभे असलेलं नाटक रसिक प्रेक्षकांना आपल्यात सामावून घेण्यात यशस्वी ठरतो. वृद्ध आणि राघवच्या संवादातून फुलत जाणारे हे नाटक मानवी मनातील भितीचा ठाव घेते.
यात वृद्ध - सौरभ कुरुंदकर आणि राघव - रवि पुराणिक यांनी आप आपल्या पात्रांना योग्य न्याय दिला तर सचिन संघई आणि संकेत पांडे यांनी सह कलावंत म्हणून विषयास पुढे नेले. सरला दिवाण, सरोज पांडे यांनी साकारलेली प्रकाश योजना हरिष शहाणे, प्रथमेश शहाणे यांचे संगीत, रेणुका पुराणिक, पूर्वा पुराणिक यांनी साकारलेलं वास्तववादी नेपथ्य, प्रसाद देशपांडे, स्वाती कुरुंदकर यांनी साकारलेलं रंगभूषा आणि वेशभूषा हे सर्वच विषयाशी अनुरूप असे होते. या नाटकाचे लेखक रविशंकर झिंगरे यांच्या लिखाणाला नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे. म्हणून रसिक प्रेक्षकांनी सभागृहात गर्दी केली होती.
आज दि. ५ मार्च रोजी नटराज कला विकास मंडळ, जिंतूर, परभणीच्या वतीने अतुल साळवे लिखित दिग्दर्शित "धर्मदंड" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण होणार आहे. उद्या दि. ६ मार्च रोजी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित "ड्रीम्स रिले" या नाट्य प्रयोगाचे सादरिकरण होणार आहे.