नांदेड| लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने दिला जाणारा यंदाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार नांदेड येथील महिला सक्षमीकरण व बालकामगार प्रथा निर्मुलन कार्यात अग्रेसर असणार्या डॉ. पी. डी.जोशी पाटोदेकर यांना बुधवार दि. 9 मार्च रोजी शाहू कला मंदिर सातारा येथे भव्य महिला मेळाव्यात प्रदान करण्यात येणार आहे. सावित्रीबाईं फुले यांचे माहेर असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील सावित्रीबाई फुले संघर्ष समितीच्यावतीने त्यांच्या विचाराने काम करणार्या कार्यकर्त्याला किंवा संस्थेला हा राज्य स्तरावरचा पुरस्कार प्रदान करण्याचे हे दहावे वर्ष आहे. असे लेक लाडकी अभियानाच्या ऍड.वर्षा देशपांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यंदाच्या वर्षी ओमिओक्रोनच्या निर्बंधामुळे 3 जानेवारीला होणारा कार्यक्रम 9 मार्च 2022 रोजी होत असून यावर्षी नांदेड येथील डॉ. पी. डी. जोशी यांना 6000 बालकामगारांना शोधून त्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल संघर्ष पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. तसेच किसान आंदोलन, पूर आणि भूस्खलन दरम्यान असामान्य काम करणार्या कार्यकर्त्यांना सामान्यातील असामान्य हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार आय.आय. टी. मुंबईचे सितारा चे संचालक प्रा. डॉ. सतिश अग्निहोत्री, (माजी सनदी अधिकारी) आणि प्रगती बाणखेले- पत्रकार महाराष्ट्र टाईम्स यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा समितीचे सदस्य गौरी अडागळे, मीना शिंदे, शैलेंद्र पाटील, राजू मुळे, कैलास जाधव, प्रगती पाटील, प्रा. सुवर्णा कांबळे, मनीषा कुपर, उमा साळुंखे, प्रा. बोंडे, प्रा. जाधव, प्रा. भाई माने, प्रा. समता माने, ऍड. वनराज पवार, ऍड. वर्षा देशपांडे हे आहेत. यापूर्वी अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार धाडसी पत्रकारितेबद्दल अलका धुपकर (मुंबई), जात पंचायतीच्या वृत्तांकनाबद्दल विलास बडे (मुंबई) आणि भीम रासकर (मुंबई), राजसत्ता आंदोलनाच्या कामासाठी आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. दारूबंदीच्या कामासाठी पारोमिता गोस्वामी (चंद्रपूर), कैलासबापू कोते पाटील (शिर्डी), न्यायाधार संस्था (अहमदनगर), शांतिगिरी आश्रम (तिरुवनंतपुरम), डॉ. मेघा देशपांडे (पनवेल), ऍड. शैला जाधव (सातारा) तर
यावर्षी नांदेड येथील डॉ. पी. डी. जोशी (पाटोदेकर) यांना सहा हजार बालकामगार शोधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल मुंबईचे सितारा चे संचालक डॉ. प्रा. सतीश अग्निहोत्री आणि प्रगती बाणखेले पत्रकार - महाराष्ट्र टाईम्स यांच्या हस्ते संघर्ष पुरस्कार देण्यात येणार आहे. केवळ राष्ट्रीय स्मारकाच्या इमारतीत सावित्रीबाईंना न आठवता त्या जगलेल्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन काम करणार्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून हा प्रेरणास्त्रोताचा झरा सातत्याने जिवंत ठेवण्याचा विचारपूर्वक निर्णय सातार्यातील संवेदनशील पत्रकार, कार्यकर्ते, वकील, प्राध्यापकांनी घेतला. तेव्हापासून सलग नऊ वर्षे सातारा जिल्ह्यातील बचत गट, महिला मंडळ, आरोग्य कार्यकर्त्या, अंगणवाडी ताई, कॉलेजमधील युवती आणि प्राध्यापिका यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतो. 9 मार्च 2022 रोजी 12 ते 4 या वेळेत हा कार्यक्रम शाहू कला मंदिर, सातारा येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे निमंत्रक ऍड. वर्षा देशपांडे यांनी केले आहे.