अतिवृष्टीने वेचणीला आलेला कापूस गळाला, सोयाबीन भिजून कोंब फुटले
हिमायतनगर| गेल्या अनेक वर्षांपासून ओल्या आणि कोरड्या दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या बळीराजाला यंदा परतीच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कधी नव्हे तेवढे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी भरले गेल्याने एवडा चिखल झाला की, वाचलेली पीक काढून बाजारापर्यंत नेणंही त्यांना शक्य झाले नाही. जेंव्हा उघड झाली, त्यावेळी शेतकऱ्यांनी उर्वरित पीक काढणीसाठी सुरुवात करताच पुन्हा कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उरले -सुरले हि निसर्गाने नेले त्यामुळे लेकी बळीचे लग्न, मुलं बाळांचे शिक्षण व घरगाड कसा चालवावा याची काळाची त्यांना लागली आहे. आता तरी शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन या संकटातून बाहेर काढावे अन्यथा बळीराजाला व मजुरदाराना आगामी दिवाळी दुष्काळात साजरी करण्याची वेळ येणार आहे.
खरीप हंगामातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने काळ्या आईची ओटी भरून सुरुवात केली होती. सुरुवातॆल चांगला पाऊस झाल्याने यंदाचा उत्पन्नातून मुलं बाळांचे लग्न थाटाने करून साहुकारच्या आणि बैंकांच्या कर्जातून मुक्त होऊ अशी भोळी अशा शेतकऱ्यांना लागली होती. मात्र यंदाच्या पावसाने मध्यंतरी महिनाभर दडी मारली आणि त्यानंतर थांबुन थाम्बुन मुसळधार आणि त्यानंतर अति मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. जिकडे तिकडं पाणीच पाणी झाल्याने शेतकरी हताश झाला आहे. या पुराच्या पाण्यासह इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे बळीराजावर यंदा सर्वात मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे नदी, नालायच्या काठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली असून, पुढे पाणी जायला मार्ग नसल्याने तुडुंब भरलेल्या विहिरी आणि नाल्याचे पाणी रानशिवारात घुसलेल्या पिकात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे उरली सुरली पिके काढून पेरणीसाठी केलेला खर्चतरी भरती करावा आणि उधारीवर आणलेल्या बियाणांचे पैसे चुकते करावे या गडबडीत शेतकरी होता.
मात्र अचानक परतीच्या पावसाने काढावा अशी अपेक्षा धरून शेतकऱ्यांनी उर्वरित सोयाबीन पिकाची कापणी करून ठेवली, तर वेचणीला आलेला कापूस काढण्याच्या तयारी असताना दि.१६ पासून अतिवृष्टी सदृश्य परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे झालेल्या रात्रभर झालेल्या ढग फुटीसारख्या पाऊसामुळे शेतकऱयांचे होत्याचे नव्हते केले आहे. यामुळे अतिमुसळधार पावसामुळे कापूस जमिनीवर पडून जाग्यावरच सडून जाताना दिसत आहे. तर सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले असून, अनेकांची ढगे व शेतात उभ्या सलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहे. त्यामुळे बळीराज्याच्या चिंतेत अधिकच वाढ झाली असून, आगामी काळात कसे जगावे या विवंचनेने शेतकऱ्यांची व मजुरदारांची झोप उडाली आहे.
अनेक शेतकऱ्यांचे शेतामध्ये सोयाबीनचे ढिग व कडपी पाण्यामध्ये भिजताना दिसले. परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाल्यानं सर्व शेतकरी वर्गाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता जर शासनाने तातडीने भरीव मदत शेतकऱ्यांना दिली नाहीतर अनेक शेतकरी कुटुंब या परतीच्या पावसामुळे रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतेच शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली, परंतु शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असताना केवळ हेक्टरी दहा हजार प्रमाणे मदत देणार असल्याने सांगितल्याने हि मदत अल्पशी असल्याने शेतकऱ्यांचा नुकसान भरून निघू शकत नाही असे अनेक नुकसानग्रस्त शेतकरी बांधव सांगित आहेत. शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाची तीव्रता लक्षात घेता शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मदतीत वाढ करून शेतकऱ्यांना जगण्यासाठी आधार द्यावा अशी रास्ता मागणी केली जात आहे.
मराठवाड्यात पावसाचे प्रमाण पाहता शेतकरी कापूस-सोयाबीन सारख्या पिकांवर अधिक भर देतात. नगदी पीक असल्याने अनेक जण या दोन्ही पिकांना पसंती देतात. मात्र यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही पिकांना मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे. सोयाबीन काढणीला आले होते तर कापसाची वेचणी सुरू असतानाच अधिकचा पाऊस झाला. त्यामुळे हातात आलेलं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर होत्याच नव्हतं झालं त्यामुळे शासनाने दिलेली मदत अपुरी असून, शेतकऱ्यांनी पुढील काळात घरगडा कसा चालवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या मादातीत वाढ करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया दिलीप लोहरेकर पाटील यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना व्यक्त केली आहे.
अनेक शेतकऱ्यांना यंदाचा पावसाळा चांगला असल्याने शेतात कापूस लावला होता. फवारणी खत खुरपणी हे सगळे मिळून एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च झाला. तर सोयाबीनला १२ ते १५ हजार एकरी खर्च झाला. त्यामुळे उत्पदनातून मागील काळात झालेले नुकसान भरून निघेल असे वाटले होते. एवढं सगळं करुन अतिवृष्टीने कापूस आणि सोयाबीन मातीमोल झाल त्यामुळे आमचा अपेक्षा भंग झाल्या आहेत. शासन काहीतरी भरीव मदत मिळेल असे वाटत होते, मात्र जाहीर केलेल्या मदतीतून शेतकऱ्यांच्या वाट्याला किती रुपये येतील या प्रश्नाने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे युवा शेतकरी सुनील सुवर्णकार यांनी म्हंटले आहे.