संशोधनामध्ये प्रगतीची गरज - दत्ता भगत

नांदेड (अनिल मादसवार) पूर्वी काहीही सुखसुविधा उपलब्ध नसतांना संशोधन विपूल प्रमाणात झालेले आहे. पण सद्या सर्व सुखसोयी, साहित्य, प्रयोगशाळा, यंत्र, संगणक, मनुष्यबळ इत्यादी सर्व गोष्टी उपलब्ध असतांना सुद्धा पाहिजे तसे संशोधन होत नाही. म्हणूनच देशाला अजूनही संशोधनामध्ये प्रगतीची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांनी व्यक्त केले. 


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २३व्या वर्धापण दिनानिमित्ताने आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. आज बुधवार (२०) रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ विज्ञान लेखक तथा मुंबई येथील मराठी विज्ञान परिषदचे सचिव डॉ.अनंत देशपांडे, जीवनसाधना गौरव पुरस्काराचे दुसरे मानकरी डॉ. अशोक कुकडे, प्र. कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि एन. सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवन साधना गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी केले. पुढे ते म्हणाले, आपण जे काही करतो ते आपल्या आनंदासाठी करतो. शिक्षण आपण विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी न देता आपल्या आनंदासाठी देत असतो, ही मानसिकता बदलली पाहिजे.समाज घडविण्यासाठी शिक्षण दिले पाहिजे, तरच देश घडेल. दुसरे जीवनसाधना गौरव पुरस्काराचे मानकरी लातूर येथील विवेकानंद रुग्णालयाचे मुख्य शल्यचिकित्सक डॉ. अशोक कुकडे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्राकडे कधीही व्यवसाय म्हणून मी बघितलेले नाही. जमेल तेवढ्या समाजातील गरजूंच्या व्याधी दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळेच मला विद्यापीठाने जीवन साधना पुरस्कार देऊन गौरव केला. या गौरवामुळे माझ्यामध्ये अजूनही जास्त काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.


पुरस्कार सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विज्ञान लेखक तथा मुंबई येथील मराठी विज्ञान परिषदचे सचिव डॉ.अनंत देशपांडे यांनी मराठी विज्ञान परिषदेचे काम आणि योगदानाबद्दल सविस्तर माहिती देतांना म्हणाले, विज्ञान मराठी भाषेत समजावून घेतले तर त्यामध्ये गोडी निर्माण होते. विज्ञानाची तत्त्वे अगदी साधे सोपे आणि सरळ आहेत. आपल्याकडे ते किचकट आणि अवघड भाषेत सांगितल्यामुळे अवघड वाटतात. मराठी विज्ञान परिषद यावरच काम करत आहे. विज्ञान मराठी भाषेत विद्यार्थ्यांना शिकवून त्याबद्दलची गोडी निर्माण करणे हाच या परिषदेचे प्रमुख उद्देश आहे. अध्यक्षीय समारोपामध्ये कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमामध्ये सातत्य आणि निस्वार्थपणे स्वतःला झोकावून देऊन डॉ. देशपांडे हा उपक्रम राबवतात. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे त्यांनी आभार मानले. पुढे ते म्हणाले, डॉ. कुकडे यांच्या निस्वार्थ वैद्यकीय सेवेचा आदर्श हा प्रेरणादायी आहे. तो येणाऱ्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशी आशा ही यावेळी त्यांनी व्यक्त केली. डॉ भगत बद्दल बोलतांना ते म्हणाले, डॉ. भगत यांचे आकर्षक व्यक्तिमत्त्व आहे. एकदा भेटल्यानंतर त्यांना परत परत भेटावसे वाटते. त्यांच्या विचारात व्यापकता आहे. जी ह्या देशाच्या भविष्यासाठी आवश्यक आहे. यानंतर कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठातील विविध उपक्रमांचा थोडक्यात आढावा सादर केला. आजची विद्यापीठाची प्रगती पाहता नॅक 'अ' दर्जावरून 'अ' प्लस निश्चित मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे यांच्यासह संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.राजेंद्र गोणारकर यांनी केले तर आभार उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपकुलसचिव महेश त्रिभूवन यांच्या माग्दार्शनाखाली मोहन किरडे, बाळासाहेब कांबळे, कपिल हंबर्डे, आनंद लुटे, जयराम हंबर्डे, बाबाराव हंबर्डे यांच्यासह शैक्षणिक नियोजन व विकास विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी