मेघ गर्जनेसह हिमायतनगरात अवकाळी पाउस...
ढगाळ वातावरणाने गारपीटची शक्यता...
जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर
हिमायतनगर(अनिल मादसवार)शनिवारी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास व रात्री ७ वाजता मेघ गर्जनेसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाउस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीतील गहू, हरभरा, करडी, आंब्याचे कैर्यानी लगडलेले फुल गळून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अर्धातास चाललेल्या या दमदार पावसामुळे हिमायतनगर येथे सुरु असलेल्या यात्रेकरूंची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यानंतरही आभाळात मेघ गर्जना होणे व वारे सुटणे सुरु असल्याने गारपीट होण्याची शक्यता अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. आगोदरच खरीप हंगामात कमी पावसामुळे नुकसानीत आलेला शेतकरी आता रब्बी हंगामात आवकाळी पाउस झाल्याने पुरता हवालदिल झाला असून, यामुळे जनावरांच्या चार्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नांदेड जिल्हा परिसरात मागील महिन्यात ढगाळ वातावरणाने आवकाळी पाउस - गारपीट होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. परंतु वातावरणात बदलाव होऊन आकाश शुभ्र झाले. यंदा पावसाळ्यात कमी पाउस झाल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्ग कोपणार काय..? असे वाटत असताना जिल्ह्यात पहिल्यांदा निसर्गाने हिमायतनगर तालुक्यात हजेरी लावली. हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा न.१,२, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणी, सिरपल्ली, आन्देगाव, पोटा, सरसम, कामारी यासह परिसरात दि.२८ शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अचानक विजांचा गडगडाट व सुसाट वार्याने हजेरी लावली.
त्यातच वादळी वार्याने जोरदार पावसाच्या सरी पडल्यामुळे काढणीला आलेला गहू, करडी, कापून ठेवलेला हरभरा अस्ता - व्यस्त झाला. तर झाडाला लगडलेली आंब्याची कैरी व मोहोर व संत्र मोसंबीचे फळे वादळी वार्याने गळून जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या वादळी वार्याने फळ बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हाताशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले आहे. या बाबीची शासनाने दाखल घेवून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना मदतीचा हातभार लावावा अशी मागणी केली जात आहे.
यात्रेच्या आनंदावर विरझन
----------------------
मागील आठ दिवसापासून हिमायतनगर येथील म्ह्साहीव्रत्र यात्रा सुरु आहे, आता कुठे यात्रेला रंगत येऊ लागली असताना शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूना मोठा फटका सहन करावा लागला असून, यात्रेचा आनंदावर विरझन पडल्याने लहान थोर यात्रेकरू मंडळीना निराशेत घरी परतावे लागले आहे.
रब्बी पिकावर मोठा परिणाम होणार- लोहारेकर
------------------------------------
आज झालेल्या पावसामुळे रब्बीच्या शेतीपिकांचे नुकसान झाले असून, अगोदरच वैरण नाही, असलेल्या वैरणावर पाऊस व वार्याचा मारा यामुळे ते सुद्धा खराब झाले आहे. आता पुढील काळ कसा काढावा, जनावरांना काय खाऊ घालावे याची चिंता वाढली. तर या पावसामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम होणार असल्याचे शेतकरी दिलीप पाटील लोहारेकर यांनी दिली.
शासनाने शेतकऱ्यांचा विचार करायला हवा - मुधोळकर
-------------------------------
या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, आंब्याचे प्रचंड नुकसान झाले असून, खरीप हंगामाची मदत अजून हातात पडली नाही. रब्बीची अशा होती. परंतु या अवकाळी पावसामुळे ते हि नुकसानीत आले आहे. उरलेले पिक काढण्यासाठी पाउस थांबणे गरजेचे आहे. असेच ढगाळ वातावरण व कडकडाट चालू राहिला तर गारपीट होऊन शेतकर्याचे पुरते कंबरडे मोडणार आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया साधन शेतकरी प्रभाकर मुधोळकर यांनी दिली.