हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आहे. याचाच फायदा घेत काही भूमाफियांकडून होणार्या वस्तीवाढ करिता प्लॉट विक्रीचा सपाटा सुरू आहे. सर्रास नियमाना बगल देऊन अकृषिक मान्यता नसणार्या जमिनीची प्लॉटिंग करून बोगस गावठाण प्रमाणपत्र जोडून मोठ्या प्रमाणावर दस्त नोंदणी होत असल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकाराला नगरपंचायत आणि तहसील अधिकाऱ्याची मूक संमती असल्यामुळे हा सर्व गैरप्रकार केला जात असल्याने प्लॉट खरेदी करणार्यांना आगामी काळात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.
हिमायतनगर शहरातुन राष्ट्रीय महामार्ग गेल्यानंतर शहर व तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर नागरी वस्त्या वाढत आहेत. त्यासाठी रस्त्याच्या जवळपास असलेल्या शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू झाला आहे. परंतु प्लॉटिंग करिता कृषक जमीन अकृषिक करण्याची प्रक्रिया जटील असल्याने यासाठी अधिकाऱ्यांशी संगनमत करून सोपा मार्ग शोधण्यात आला आहे. गावठाण प्रमाणपत्र प्रकरण हे गंभीर स्वरूपाचे असून, सध्या तालुक्यात गावठाण प्रमाणपत्र रॅकेट सक्रीय झाले आहे.
ज्याच्या आधारावर गायरान, शासकीय, पांदण रस्ते, कृषीक जमिनीतील भूखंड, नाल्या सर्वच गिळंकृत करून गावठाण प्रमाणपत्राच्या आधारे नोंदणीकृत विक्री करण्याचा भूमाफियांनी सपाटा लावला आहे. यामध्ये शासकीय यंत्रणा व भूमाफियामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दलाली होताना दिसत आहे. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नागरिक व शासनाला महसूल रूपाने सोसावा लागत आहे. गावठाण प्रमाणपत्राची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. परंतु अशी यंत्रणा सध्या उपलब्ध नाही.
नगरपंचायत ग्रामपंचायत क्षेत्रातील असलेल्या मूळ गावठाण व वस्ती वाढ मालकी जमिनीची नोंद पडताळणे आवश्यक आहे. तसेच एन ए झाल्यानंतर नियमानुसार शासकीय प्लॉट सोडणे बंधनकारक आहे, मात्र असे ना करता थेट प्लॉट विक्री करून आपला स्वार्थ साधून घेतला जात आहे. परंतु दस्त नोंद करत असताना पडताळणी होत नसल्याने भूमाफिया चांगलेच फोफावले आहेत. परंतु अवैध व बोगस गावठाण यामुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय जमिनी, इनामी जमिनी, निजामकालीन तलाव, पांदण रस्ते गिळंकृत करण्यात आले असून याबाबत सखोल चौकशी करून बेकायदेशीर कृत्य झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.