गांजेगावच्या पुलावरून पुराचे पाणी; दुसऱ्यांदा विदर्भ - मराठवाड्याचा संपर्क तुटला -NNL


हिमायतनगर, अनिल मादसवार|
विदर्भ उमरखेड - आणि मराठवाडयाच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एका नदी दुथडी भरून वाहत आहेत. दोन दिवसाच्या उसंतीनंतर झालेल्या पावसामुळे गांजेगावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सकाळपासून विदर्भ - मराठवाडयांचा संपर्क दुसऱ्यांदा तुटल्याने दळणवळन वाहतुक ठप्प झाली आहे. हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नदीकाठचे नागरिक करत आहेत.


मागील अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मिसळत आसल्यामुळे नदीला महापूर येतो. यंदाही मागील ८ दिवसात झालेल्या पुराच्या पाण्याने गावानजीक नाले, नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने उसंती दिल्यानंतर अनेक नेत्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानांतर शेतकऱ्यांनी देखील शेतातील पिकांना उभारी देण्यासाठी फवारणीसह विविध कामे मार्गी लावले. मात्र पुन्हा दि.१७ च्या दुपारपासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली.  रात्रभर झालेल्या पावसामुळे विदर्भ – मराठवाड्याला जोडणारा गांजेगाव येथील पुलावरून पुराचे पाणी आल्याने पुन्हा एकदा गंजेगाव बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने दळणवळनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे येथील बंधाऱ्यावरून पाणी कमी होत नाही तोपर्यंत दळणवळणासाठी नागरिकांना ३० ते ३५ किमि. दूरचा प्रवास म्हणजे बोरी मार्गाच्या पुलावरून आपले गाव गाठावे लागते हे वास्तव आहे. 

या संदर्भात नांदेड न्यूज लाइव्हने गत १० वर्षापासून सतत बातम्याही प्रकाशित केल्या आहेत. जर हा पूल उंच करण्यात आला तर मराठवाड्यातून विदर्भात जाण्यासाठीचे अंतर या पुलामुळे कमी होऊन वारंवार मार्ग बंद होण्याच्या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे. मात्र याकडे आत्तापर्यंतच्या एकही खासदारांनी व पैनगंगा प्रकल्पच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने नदीकाठच्या गावकऱ्यासह विदर्भ - मराठवाड्यात कमी वेळात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात संपर्क तुटण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. यासाठी अनेक राजकीय नेत्यांकडे नव्याने पूल उभारून पुलाची उंची वाढविण्यासाठी नवीन पुलास मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी ढाणकी, गांजेगाव, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्लीसह उमरखेड/ हिमायतनगर तालुक्याच्या दोन्ही भागातील गावकऱ्यानि केली आहे.

हा मार्ग म्हणजे विदर्भ- मराठवाडा- तेलंगणा – आंध्रप्रदेश – कर्नाटकला जोडलेला आहे. हा रस्ता ये-जा करणाऱ्या धार्मिक दिंड्यां मार्गक्रमणाचा असून, तीर्थक्षेत्र माहूर, बासर, पोहरा देवी येथे भक्तांची आवक – जावक होते. तसेच विदर्भातील नागरिकांना अल्प खर्चातून रेल्वे प्रवास करण्यासाठी जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ राहत असल्याने या मार्गात अडसर ठरलेला पैनगंगा नदीवरील गांजेगावचा पुलाची उंची वाढऊन नव्याने बांधणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हा पूल कम बंधारा झाला तर वरील भागात पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना साठून राहणाऱ्या पाण्याचा देखील नक्कीच फायदा होणार आहे. पावसाळ्यात विदर्भ – मराठवाड्याचा संपर्क तुटण्याचे प्रकार थांबतील व दळणवळणातील अडथळे दूर होऊन, समोरील गावांना होणाऱ्या पुराचा धोका टळून गावकरी चिंतामुक्त होतील. दोन्ही विभागातील अनेक गावांना याचा फायदा होईल अशी रास्ता अपेक्षा या भागातील जनतेची आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी