इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले...अप्रशिक्षित शिक्षकामुळे चिमुकल्यांचे भवितव्य अधांतरी
हिमायतनगर(अनिल मादसवार)चालू शैक्षणिक वर्षामध्ये शहरासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जागोजागी पेव फुटल्याने पालकामध्ये मुलांच्या प्राथमिक शिक्षणाबाबत संभ्रम निर्माण होत आहे. अश्या शाळांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्याने चिमुकल्यांच्या भवितव्याशी संस्था चालक खेळत असून, शिक्षणाचा बाजार जोमाने चालविला जात आहे.
जागतिकीकरण व विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजी भाषेला आलेले महत्व व आपले पाल्य गुणवत्ता धारक व्हावे हि मानसिकता हेरून खाजगी शिक्षण संस्थांनी आकर्षक जाहिराती व हैन्ड बिलाच्या माध्यमातून पालकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, विजेचे खांब, सार्वजनिक इमारती, बस स्थानक रेल्वे स्थानक, आदीसह चौका चौकात व प्रवाशी वाहनावर इंग्रजी शाळांच्या जाहिरातबाजीला उत आला आहे. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, हि मंडळी एवढ्यावरच न थांबता वाहनावर ध्वनिक्षेपक कर्णकर्कश आवाजात जाहिरात बाजीची स्पर्धा करून ध्वनी प्रदुशानता भर टाकत आहेत. आपल्या जाहिरातीमधून मुलांचे सुप्त गुण हेरून त्याचा सर्वांगी विकास करू असा दावा केला जात असल्यामुळे अनेक पालक जाहिरात बाजीला बळी पडून भरभक्कम फिसच्या नावाखाली रक्कम देवून प्रवेश निश्चित करीत आहेत. काही शाळांच्या जाहिरातीमध्ये इंग्रजी शब्दांचे चक्क स्पेलिंग चुकीचे असल्याचे इंग्रजी विषयाच्या जाणकार व्यक्तीकडून बोलेल जात आहे. तर असे चुकीचे शब्द पालक व विद्यार्थ्यावर बिम्बविल्या गेल्यास इंग्रजी भाषेचे भविष्य काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नव्याने थाटण्यात येत असलेल्या व जुन्या असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये भौतिक सुविधांचा अभाव सातत्याने आढळून येत असून, वर्ल्ड क्लासच्या नावाखाली थर्डक्लास शिक्षणाचा धंदा संस्था चालकांनी चालविला आहे. अनेक इंग्रजी शाळामध्ये चिमुकल्यांना पिण्याच्या व्यवस्था खेळाचे मैदान, बसण्यासाठी नीट आसन व्यवस्था, खोल्यांची दुरवस्था, धुळीने माखलेले मैदान अशी दुरवस्था अनेक शाळांची दिसून येते. त्यातच अपुरा व अप्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि वाहनांची नीट व्यवस्था नसल्याने कोंबड्यागत चिमुकल्यांना ऑटोतून कोंबून शाळेपर्यंत पोन्चविल्या जात असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. हा सर्व प्रकार शिक्षण विभागाच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून संस्था चालक करत असल्याचा आरोप सुजाण पालक वर्गातून करण्यात येत आहे. या प्रकाराकडे शिक्षण विभागाने लक्ष देवून इंग्रजी शाळांवर प्रशिक्षित शिक्षकासह भौतिक सुविधाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे.