⭕दरोडोखोरांनी खून केल्याचा आरोपीचा बनाव,
⭕पोलिसांनी सहा तासात घटनेचा छडा लावून आरोपीस केले गजाआड
सोलापुर| पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी अंगठा न दिल्याच्या कारणावरून शाकूबाई मारुती कोकरे (वय ४७) हिस चाकूने भोकसून खून केल्याची घटना नंदेश्वर येथे घडली असून या प्रकरणी आरोपी दादा उर्फ राजाराम बाबूराव शेजाळ याने गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान,या घटनेत दरोडेखोरांनी खून केल्याचा बनाव प्रथमतः करण्यात आला होता.मात्र पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत या खूनाचा छडा केवळ सहा तासात लावून आरोपी जेरबंद केले.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मध्यरात्री १२.३० च्या दरम्यान मयत शाकूबाई मारुती कोकरे हिचा राहते घरी नंदेश्वर येथे कोणीतरी गळयावर चाकूने वार करून अज्ञात दरोडेखोरांनी खून केल्याची माहिती मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळाली.सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून त्यांनी घटनास्थळाला भेट दिली असता पत्र्याच्या घरामध्ये मयत महिलेस टेकवून बसविल्याचे दिसून आले. तसेच सदर मयत महिलेच्या गळयावर धारदार शस्त्राने वार केल्याने तीचे केस ,कपडे व अंथरूण रक्ताने माखले होते. त्याचबरोबर झोपलेल्या ठिकाणी एक धारदार चाकूही रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलिसांना दिसून आला.
पोलिसांनी या घटनेबाबत उपस्थित लोकांकडे चौकशी केली असता घरामध्ये दरोडेखोर घुसून मारून पळून जाताना दिसून आल्याचे चौकशीत सांगितले.पोलिसांनी त्या आधारे व घटनास्थळाचा व परिस्थितीचा अभ्यास करून आरोपी दादा उर्फ राजाराम बाबूराव शेजाळ व त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता दोघांच्या बोलण्यात तफावत आढळून आली. परिणामी पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता राजाराम शेजाळ याचे नावे असलेली पाच एकर जमीन नावे करण्यासाठी अंगठा देत नसल्याच्या कारणावरून चाकूने गळयावर वार करून खून करून अज्ञात चोरटयाने खून केल्याचा बनाव केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते.
सदर आरोपीने खूनाची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.नंदेश्वर येथील घटनास्थळाला नूतन पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी तसेच अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व अन्य पोलिस अधिकार्यांनी भेट देवून घटनेमागील कारणमिमांसा जाणून घेतली.या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.